उन्हाचा तडाखा वाढला; साताऱ्यातील कास धरणाचा साठा घटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:01 IST2026-03-25T18:58:29+5:302026-03-25T19:01:34+5:30
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करत असलेले कास धरण १९ जून २०२५ रोजी पूर्ण क्षमतेने भरून सातारकरांची पाण्याची चिंता ...

संग्रहित छाया
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करत असलेले कास धरण १९ जून २०२५ रोजी पूर्ण क्षमतेने भरून सातारकरांची पाण्याची चिंता मिटली. सद्य:स्थितीला शहराला दररोजचा पाणीपुरवठा, वातावरणात उष्णता वाढल्याने बारा फूट पाणीपातळीत घट झाली. गतवर्षीच्या तुलनेत सद्य:स्थितीला एक फुटाने पाणी कमी असले तरी धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे.
कास धरणाची उंची वाढविल्यानंतर मागील तीन वर्षांपासून पावसाळ्यात मृत पाणीसाठा वगळता ६१.०४८ फूट पाणीसाठा होत आहे. कास धरणाची पाणीपातळी २०२५ मध्ये मार्च महिन्याच्या उत्तर पंधरवड्यात ५० फुटांवर होती. १९ जून २०२५ मध्ये सांडव्यावरून धरण ओव्हरफ्लो झाले. पाणीपातळीत घट होत असली तरी मुबलक प्रमाणात धरणात पाणीसाठा शिल्लक असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न मिटला आहे; परंतु पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.
कास धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाकडून पूर्ण होऊन २०२२ च्या तुलनेत गत तीन वर्षांपासून अडतीस फूट अधिक पाणीसाठा होत आहे. धरणाच्या जुन्या भिंतीची लांबी २५० मीटर होती. तिच्यापासून साधारण ६० मीटर अंतरावर नवीन भिंत बांधून तिची लांबी ५८०.५० मीटर, उंची २८.७० मीटर आहे. जुन्या धरणात २३ फूट पाणीसाठा होत होता. धरण पूर्ण झाल्याने २०२२ मध्ये साडे एकोणपन्नास फूट पाणीसाठा झाला. २०२३ व २०२४, २०२५ मध्ये मृतसाठा पावणेअठरा फूट व ६१.०४८ फूट पाणीसाठा, असा एकूण ७८.७२० फूट पाणीसाठा झाला.
जुन्या धरणात ११२२.४० मीटर तलांकापर्यंत पाणी अडवले. २०२२ मध्ये धरण पूर्ण झाल्यावर ११३०.५० मीटर तलांकापर्यंत पाणीसाठा झाला तर गतवर्षी ११३४ मीटर तलांकापर्यंत पाणीसाठा होऊन जुन्या धरणाच्या पाणीसाठ्याच्या पाचपट पाणीसाठा नवी धरणात झाला आहे.
दीडशे वर्षे ०.१ टीएमसी होणारा पाणीसाठा गत तीन वर्षांपासून ०.५० टीएमसी झाला. आतापर्यंत बारा फूट पाणीपातळीत घट झाली असून, सद्य:स्थितीला धरणात ४९.०४८ फूट पाणीसाठा शिल्लक आहे. - जयराम किर्दत, पाटकरी, कास धरण