लोणंद : लोणंद, ता. खंडाळा ते नीरा आणि लोणंद ते तरडगाव रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवार (दि. ७) रोजी पासून सुरुवात केली आहे. त्यामुळे आता वारकऱ्यांची वारी सुखकारक होणार आहे.या रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्ता दुरुस्तीची मागणी लोणंद ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे शासनाला कोणी केली होती. पालखी सोहळ्याचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्डे, साईडपट्ट्या, अतिक्रमणे काढून, झाडेझुडपे काढून, गटारे काढून पाण्याचा निचरा होईल, अशी सोय केली आहे. गेल्या अनेक वर्षांत या रस्त्यावरील खड्डे मुजवण्यासाठी लाखोंचा निधी सरकारने केला आहे. परंतु अनेक वेळा खड्डे मुजवून ही या रस्त्याची दुरवस्था संपलेली नाही. या निधीतून रस्त्याचे नवीन काम झाले असते. मात्र, आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग चौपदरीकरणाच्या नियोजनामुळे येथे दुरवस्था झाली होती. रस्त्यातील खड्डे मुजवण्याचे काम दोन-तीन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. पालखी सोहळ्याबरोबर चालणाऱ्या वारकऱ्यांची वारी सुखकर व्हावी, यासाठी पालखीमार्गाची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्यातील खड्डे भरण्याबरोबरच साईडपट्ट्यांचे कामही केले जात आहे. (वार्ताहर) अतिक्रमण काढण्याचे आवाहन माउलींची पालखी ज्या रस्त्याने मार्गक्रमण करणार आहे त्या रस्त्याच्या बाजूला नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. पालखी सोहळा पोहचण्यापूर्वी दि. ११ व १२ जुलै रोजीच्या आत अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती लोणंद बांधकाम विभागाच्या शाखेने दिली आहे.
वारकऱ्यांची वारी होणार सुखकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2015 23:44 IST