Pune-Bangalore Highway: सहापदरीकरणाच्या कामाविरोधात ग्रामस्थ रस्त्यावर, साताऱ्यातील भरतगावच्या नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:07 IST2026-03-14T17:06:51+5:302026-03-14T17:07:08+5:30
पुलाची उंची वाढविणे आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी वारंवार करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष

Pune-Bangalore Highway: सहापदरीकरणाच्या कामाविरोधात ग्रामस्थ रस्त्यावर, साताऱ्यातील भरतगावच्या नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
अंगापूर : सातारा तालुक्यातील पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाविरोधात भरतगाव व भरतगाववाडी येथील ग्रामस्थांनी गुरुवारी आक्रमक भूमिका घेत काम बंद पाडले. पुलाची उंची वाढविणे आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी वारंवार करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी हा पवित्रा घेतला.
भरतगाव व भरतगाववाडी ही गावे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वसलेली आहेत. सध्या असलेल्या पुलाची उंची कमी असल्यामुळे नागरिकांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे गावातील नागरिक, शेतकरी तसेच प्रवाशांना ये-जा करणे अत्यंत जिकिरीचे ठरते. या समस्येबाबत ग्रामस्थांनी तसेच दोन्ही ग्रामपंचायतींनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.
तत्कालीन जिल्हाधिकारी व पोलिस प्रमुख यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज थेट काम बंद पाडत निषेध व्यक्त केला. यावेळी संबंधित विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक ही उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा
पुलाची उंची वाढवून रुंदीकरण करण्यात यावे, तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था करावी. अन्यथा येत्या काही दिवसांत भरतगाव व भरतगाववाडी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतींच्या वतीने महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या मागण्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.