सरकारची वर्षपूर्ती: साताऱ्यात 'आयटी पार्क'चा आदेश, महामार्गाची कामे कधी?
By नितीन काळेल | Updated: December 5, 2025 19:22 IST2025-12-05T19:21:21+5:302025-12-05T19:22:31+5:30
अनेक कामे मार्गी; आश्वासने पूर्णत्वासाठी प्रयत्न

सरकारची वर्षपूर्ती: साताऱ्यात 'आयटी पार्क'चा आदेश, महामार्गाची कामे कधी?
नितीन काळेल
सातारा : विधानसभा निवडणूक होऊन राज्य सरकार स्थापनेला वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही कामे मार्गी लागली आहेत. तर काही कामांना निधीही मंजूर झालेला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील विविध कामांना गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. तसेच जिल्ह्याचे चार मंत्री असल्याने विकासकामे करण्यासाठी निधीही मिळत आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्य विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीचेसरकार सत्तेवर आले. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यात प्रथमच सर्व आठही मतदारसंघातील आमदार हे महायुतीचे आहेत. सातारा, माण, कराड उत्तर आणि कराड दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर पाटण आणि कोरेगाव मतदारसंघात शिंदेसेना तसेच वाई व फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. सरकार महायुतीचे असल्याने सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघात निधी आणून कामे मार्गी लावली आहेत.
चार मंत्री जिल्ह्यातील...
सातारा जिल्ह्याच्या इतिहासात दुसऱ्यांदा चार मंत्री झाले आहेत. पण, चाैघेजणही कॅबिनेट मंत्री असण्याची पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे चाैघांकडेही महत्त्वाची खाती आहेत. शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असून, ते पर्यटनमंत्रीही आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद आहे. तर जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास तर मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसनमंत्रीपद आहे.
पाटण तालुक्यात पर्यटनासाठी निधी...
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधीही प्राप्त केला आहे. यामुळे पाटणचे पर्यटन वाढणार आहे. तसेच रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. तर जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात पाटण तालुक्याचा मोठा सहभाग राहणार असल्याचेही स्पष्ट होत आहे.
माण तालुक्यात पाणी योजनांची कामे...
माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीत आताची निवडणूक पाणी प्रश्नावरील शेवटची निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांची पावले त्यादृष्टीने पडत आहेत. कारण, माणच्या दक्षिण-पूर्व भागात टेंभूच्या पाणी योजनेचे काम सुरू आहे. तसेच इतर भागातही लवकरच पाणी पोहोचण्यासाठी मंत्री गोरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर अनेक भागात पूर्वीच योजनेचे पाणी पोहोचलेले आहे.
मार्गी लागलेले प्रकल्प...
- शासनाकडून रस्त्यांसाठी निधीची तरतूद झाल्याने जिल्ह्यात रस्ते डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागला.
- मुनावळे येथे जल पर्यटन केंद्र तर २ कास तलावातही जलसफारी सुरू झाली.
- सातारा पालिकेची प्रशासकीय 3 इमारत आता अंतिम टप्प्यात आहे. पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे काम हे प्रगतीपथावर आहे.
ही आश्वासने कायम...
- लिंब येथे आयटी पार्क उभारले जाणार आहे. याबाबतची अधिसूचना निघाली. अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा.
- साताऱ्यातील मेडिकल कॉलेज उभारणीचे काम सुरू असले तरी निधीविना कामात अडथळा येत आहे.
- कोयना, कांदाटी खोऱ्यातील आरोग्य केंद्र उभारणीचा प्रश्न अजूनही कागदावरच
मागील सहा वर्षांत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे आणली आहेत. अनेक कामे पूर्णत्वास गेलेली आहेत. त्याचबरोबर मतदारसंघात पुढील ५० वर्षांचे नियोजन करुन कामे सुरू आहेत. या कामांसाठी निधीही आणण्यात आला आहे. - महेश शिंदे, आमदार