सातारा जिल्ह्यात वळवाचा साडेआठ हजार शेतकऱ्यांना फटका, पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:30 IST2025-06-07T17:30:09+5:302025-06-07T17:30:31+5:30

१९८३ घरांनाही पावसाचा दणका

Unseasonal rains in Satara district affect 8500 farmers | सातारा जिल्ह्यात वळवाचा साडेआठ हजार शेतकऱ्यांना फटका, पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार

सातारा जिल्ह्यात वळवाचा साडेआठ हजार शेतकऱ्यांना फटका, पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार

सातारा : जिल्ह्यात मागील मे महिन्याच्या उत्तरार्धात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे, तसेच वळवाचा ८ हजार ४६६ शेतकऱ्यांनाही फटका बसला असून, २ हजार ४८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १ हजार ९८३ घरांनाही पावसामुळे दणका बसला आहे. तरीही अजून पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १८ मे नंतर वळवाचा पाऊस सुरू झाला. वाऱ्याबरोबरच धो-धो पाऊस पडत होता. सलग ७ दिवस कोसळधारा सुरू होत्या. त्यातच तब्बल ५० महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे शेती, पिके, घरे, गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे.

तरीही आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २ हजार ४८४ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. कांदा, बाजरी, टोमॅटो, भुईमूग, भाजीपाला, ढोबळी मिरची आदी पिकांना फटका बसला आहे. यामध्ये ७ हजार ६६१ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांना भरपाईपोटी २ कोटी ३४ लाख रुपये लागण्याचा अंदाज आहे, तसेच पावसात ८०५ शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले आहे. १६९ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. यासाठी ११ लाख ७२ हजार रुपयांची मदत अपेक्षित आहे.

पाऊस काळात दोघांचा मृत्यू..

जिल्ह्यातील पाऊस काळात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आलेले आहे. माण तालुक्यात नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पडल्याने बुडून एकाचा मृत्यू झाला आहे, तर खटाव तालुक्यात विजेचा धक्का बसल्याने एक जण मृत झाला आहे.

२९ गोठे पडले..

संपूर्ण जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडला. यामध्ये सर्वच ११ तालुक्यांत घरांचे आणि गोठ्यांचे नुकसान झालेले आहे. अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या १ हजार ९६९ आहे, तर १४ घरे पूर्णपणे पडलेली आहेत, तर जनावरांचे २९ गोठे बाधित झाले आहेत. यासाठी १ कोटी २ लाख ६१ हजारांचा निधी मदतीसाठी लागण्याचा अंदाज आहे.

५५ जनावरांचा मृत्यू..

वळीव पावसाचा शेतकऱ्यांनाच अधिक करून फटका बसला आहे. पिकांचे नुकसान झाले, तसेच जमीनही वाहून जाण्याचा प्रकार घडला आहे. गोठेही पडले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील तीन तालुक्यांत लहान ३७ आणि मोठी १८ जनावरेही मृत झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच झाले आहे.

Web Title: Unseasonal rains in Satara district affect 8500 farmers