साताऱ्यात दुपारी वाढता पारा; सायंकाळी अवकाळीच्या धारा..! 

By नितीन काळेल | Published: March 30, 2024 04:20 PM2024-03-30T16:20:58+5:302024-03-30T16:21:22+5:30

पावसामुळे उकाडा कमी : बच्चे कंपनीची भिजून धमाल; शेतकऱ्यांपुढे चिंता निर्माण 

Unseasonal rain in Satara, Relief to citizens from heat | साताऱ्यात दुपारी वाढता पारा; सायंकाळी अवकाळीच्या धारा..! 

साताऱ्यात दुपारी वाढता पारा; सायंकाळी अवकाळीच्या धारा..! 

सातारा : सातारा शहरवासीयांना मागील सहा दिवसापासून कडक उन्हाळ्याला सामोरे जावे लागत असतानाच शनिवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी धारा पडल्या. यामुळे उकाडा कमी झाला. तर या पावसात भिजण्याचा आनंद बच्चे कंपनीने घेतला. मात्र, या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. 

सातारा शहराबरोबरच जिल्ह्याचा पारा मागील सहा दिवसांपासून ३८ ते ३९ अंशाच्या दरम्यान आहे. त्यातच तीन दिवसांपूर्वी सातारा शहराचे कमाल तापमान ३९.१ अंश नोंद झाले होते. हे या नवीन वर्षातील उच्चंकी तापमान ठरले होते. त्यातच सतत पारा वाढत असल्याने दुपारच्या सुमारास कडक उन्हाचा सामना सातारावासीयांना करावा लागत आहे. तसेच उकाड्याने हैराण होण्याची वेळ आली आहे. असे असतानाच शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास सातारा शहराच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. 

जवळपास दहा मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले होते. तर पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरील वर्दळही कमी झाली होती. या पावसामुळे  हवेत गारवा निर्माण झाला होता. परिणामी उकाडा काही प्रमाणात कमी झाला. यामुळे सातारकर वासियांना थोडासा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या अन्य काही भागातही अवकाळी पाऊस झाला आहे. मात्र, या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. 

जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला होता. काही ठिकाणीच पाऊस झाला, पण शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागले. माण तालुक्यातील काळचौंडी येथे बेदाणा भिजून नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसला. त्यातच सध्या माण, खटाव, फलटण, कोरेगावसह इतर तालुक्यातही रब्बी हंगामातील पीक काढणी आणि मळणी अजूनही सुरू आहे. त्यावरही या पावसाचा परिणाम होणार आहे.

Web Title: Unseasonal rain in Satara, Relief to citizens from heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.