संभाजीनगरमधील कंपनीच्या खत, औषधांची बिगर परवाना विक्री, साताऱ्यात पर्दाफाश; वर्षभर पाळत ठेवून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:45 IST2025-08-13T13:44:57+5:302025-08-13T13:45:43+5:30

दोघांवर गुन्हा नोंद, कृषी विभागाची कारवाई

Unlicensed sale of medicines and fertilizers from a fertilizer manufacturing company in Chhatrapati Sambhajinagar district in Satara | संभाजीनगरमधील कंपनीच्या खत, औषधांची बिगर परवाना विक्री, साताऱ्यात पर्दाफाश; वर्षभर पाळत ठेवून कारवाई

संभाजीनगरमधील कंपनीच्या खत, औषधांची बिगर परवाना विक्री, साताऱ्यात पर्दाफाश; वर्षभर पाळत ठेवून कारवाई

सातारा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका खत उत्पादक कंपनीच्या औषधे आणि खताची साताऱ्यात विना परवाना विक्री करून बिलही न देणाऱ्यांचा कृषी विभागाने पर्दाफाश केला. तसेच या घटनेत १ लाख २३ हजार ४९० रुपये किमतीचा मालही जप्त करण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार आणि कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणात कडू एकनाथ अधाने (रा. पिंपळगाव दिलवशी कॅंन्टोमेन्ट, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि गणेश चंद्रभान साळुंखे (रा. रायपूर, ता. देवगाव सैनिक शाळेजवळ, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सोमवार, दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संजय फडतरे यांना गोपनीय सूत्रांकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ‘जीएस ॲग्रो‘ या खत उत्पादक कंपनीची खते व औषधे विक्रीसाठी सातारा जिल्ह्यातील शिवथर, तडवळे, सातारा, रहिमतपूर आणि पुसेगाव या ठिकाणी येणार असल्याचे समजले . यानंतर जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, गुण नियंत्रणचे कृषी अधिकारी युवराज काटे आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यातील अजिंठा चौकात सापळा रचला. 

दुपारनंतर गाडी (एमएच. २०, बीसी. ८१५८) आली. त्यामध्ये ‘जीएस’ ॲग्रो या कंपनीची खते व औषधे आल्याचे समजले. बनावट ग्राहक पाठवून खात्री केली तसेच तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारची खते व औषधे असा एकूण रुपये १ लाख २३ हजार ४९० रुपये किमतीचा साठा अधिकाऱ्यांना आढळला . तो जप्त करण्यात आला. तक्रारीनंतर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

वर्षभर पाळत ठेवून कारवाई..

छत्रपती संभाजीनगरमधील या कंपनीची शेतीविषयक खते आणि रासायनिक औषधांची विक्री सातारा जिल्ह्यात मागील एक ते दीड वर्षांपासून विना परवाना विक्री सुरू असल्याचीही माहिती कृषी विभागाकडे होती. पण, संबंधित जाळ्यात अडकत नव्हते. मात्र, सोमवारी कृषी विभागाला गोपनियरित्या माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली.

औषधे तपासणीसाठी..

कृषी विभागाने जप्त केलेली औषधे आणि खतांबद्दल कृषी विभागाला संशय आहे. त्यामुळे विभागाने या साठ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तपासणीनंतरच खते आणि औषधे बोगस की प्रमाणित हे समजणार आहे.

Web Title: Unlicensed sale of medicines and fertilizers from a fertilizer manufacturing company in Chhatrapati Sambhajinagar district in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.