Satara: टेम्पोखाली सापडून दोन तरुणी जागीच ठार, आटके टप्पा येथे अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:12 IST2025-05-15T12:06:12+5:302025-05-15T12:12:27+5:30
कऱ्हाड : टेम्पोने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील दोन तरुणी टेम्पोच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर आटके (ता. ...

Satara: टेम्पोखाली सापडून दोन तरुणी जागीच ठार, आटके टप्पा येथे अपघात
कऱ्हाड : टेम्पोने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील दोन तरुणी टेम्पोच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर आटके (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत बुधवारी हा अपघात झाला. करिष्मा ऊर्फ प्राजक्ता कृष्णत कळसे (वय २७, रा. रेठरे खुर्द, ता. कऱ्हाड), पूजा रामचंद्र कुऱ्हाडे (२५, रा. येरवळे, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या तरुणींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या, तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील करिष्मा आणि येरवळे येथील पूजा या दोघीही मलकापूर येथील डीमार्ट मॉलमध्ये नोकरी करीत होत्या. बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांची कामावरून सुटी झाली. त्यांचाच एक सहकारी आजारी असल्याने, त्या वाठार येथे त्या सहकाऱ्याला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या.
आटके टप्पा येथे त्या पोहोचल्या असताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील पूजा आणि करिष्मा या दोघी टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्या. डोक्यावरून चाक गेल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह अपघात विभागाचे कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी अपघात स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले, तसेच वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.