Satara Crime: पिस्तूल बाळगणारे दोन संशयित ताब्यात, कराड पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:17 IST2025-11-08T15:17:12+5:302025-11-08T15:17:44+5:30
१ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Satara Crime: पिस्तूल बाळगणारे दोन संशयित ताब्यात, कराड पोलिसांनी केली कारवाई
कराड : कराड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध कारवाई करून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, मोबाइल फोन आणि दुचाकीसह एकूण १ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या आदेशानुसार, कराड व मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय आणि अग्निशस्त्रधारकांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
शुक्रवार, दि. ०७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी कराडच्या पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, अल्तमश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी (वय २५, रा. पालकरवाडा मंगळवार पेठ, कराड) व ओमकार दीपक जाधव (२२, रा. होली फॅमिली हायस्कूलजवळ, विद्यानगर सैदापूर, ता. कराड) हे दोघे मौजे सैदापूर गावच्या हद्दीतील कॅनॉल परिसरात बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगून वावरत आहेत.
त्यामुळे पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी तत्काळ आपल्या कार्यालयातील पथकास सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून संशयित दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान संशयितांकडून पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल, सहाशे रुपयाचे एक जिवंत काडतूस, पंधरा हजार रुपयांचा एक स्मार्ट मोबाइल फोन, ७५ हजार रुपयांची दुचाकी, असा १ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, पोलिस अंमलदार प्रवीण पवार, सागर बर्गे, प्रशांत चव्हाण, मयूर देशमुख यांनी केली.