Satara: टोल भरण्यास सांगितल्याचा रागातून दोघांना दहा जणांकडून बेदम मारहाण, तासवडे टोल नाक्यावरील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:18 IST2026-03-10T13:16:37+5:302026-03-10T13:18:48+5:30
तळबीड पोलिस ठाण्यात बारामतीतील १० जणांविरुद्ध तक्रार दाखल

Satara: टोल भरण्यास सांगितल्याचा रागातून दोघांना दहा जणांकडून बेदम मारहाण, तासवडे टोल नाक्यावरील प्रकार
कराड (जि. सातारा) : टोल भरण्यास सांगितल्याचा कारणावरून नऊ ते दहा जणांनी दोघा टोलवसुली कर्मचाऱ्यांस शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना रविवार, दि. ८ रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास तासवडे तोल नाक्यावर घडली. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध तळबीड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
रविवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास गाडी (एमएच १३ बीएन ८८७३) ही पी. ५ लेनवरून टोल न भरता निघाली होती. म्हणून टोलनाक्यावरील कर्मचारी हर्षद संभाजी लवंघरे (वय ३०,तासवडे टोल नाका, कराड) यांनी गाडीवरील चालक कुलदीप होनाजी सोलनकर (रा. माळेगाव ता. बारामती) यास गाडी थांबविण्यास सांगितले, तसेच ‘तुम्ही टोल न भरता जात आहात, टोल भरून जावे किंवा ऑनलाइन जेवढा टोल असेल तो भरावा,’ अशी विनंती केली.
टोल भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने कुलदीप सोलनकर आणि गाडीतील इतर चार व दुसऱ्या गाडीतील इतर चार जणांनी हर्षद लवंघरे, तसेच प्रशांत शिवदास या दोघांना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी, तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली.
दरम्यान, मारहाणप्रकरणी हर्षद संभाजी लवंघरे यांनी कुलदीप होनाजी सोलनकर रा. माळेगाव (ता. बारामती) आणि त्याचे इतर सहकारी अजय महादेव निगडे (२०, रा. लामजेवाडी, ता. बारामती), लोभ दादासाहेब बोडके, युवराज बापूराव सोलनकर, निखिल यशवंत सोलनकर (२२, तिघे रा. माळेगाव, ता. बारामती), तसेच सोबत असणाऱ्या गाडी (एमएच १२ टीव्ही ९८५४) मधील निर्भय विकास पवार (२१), रिजवान सलीम पठाण (१८), पार्थ नितीन सागर (१९, तिघे रा. माळेगाव, ता. बारामती), आर्यन मोहन कोकरे, अभिषेक अनिल धुमाळ (दोघे रा. धुमाळवाडी, ता. बारामती), सुशांत अजय देवकाते (२२, रा. निरावागज, ता. बारामती) यांच्याविरुद्ध तळबीड पोलिस ठाण्यात हर्षद संभाजी लवंघरे (३०, तासवडे टोल नाका, कराड) यांनी फिर्याद दिली आहे.