Satara Crime: विस्तार अधिकाऱ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात!, महाबळेश्वरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:03 IST2025-11-28T13:03:35+5:302025-11-28T13:03:55+5:30
सोईस्कर ग्रामपंचायतीचा चार्ज देण्यासाठी बीडीओंकडे शिफारस करतो म्हणत घेतली लाच

Satara Crime: विस्तार अधिकाऱ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात!, महाबळेश्वरमधील घटना
महाबळेश्वर: एकाच तक्रारदाराकडून १५ हजार व दीड हजाराची वेगवेगळी लाच घेताना महाबळेश्वर पंचायत समितीचा विस्तार अधिकारी व आपले सरकार केंद्रातील तालुका व्यवस्थापकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी महाबळेश्वर पंचायत समितीमध्ये करण्यात आली.
विस्तार अधिकारी सुनील संभाजी पार्टे (वय ५०, रा. मूळ रा. मांघर, ता. महाबळेश्वर), ओंकार संतोष जाधव (वय २७, रा. चिखली, ता. महाबळेश्वर) अशी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सोईस्कर ग्रामपंचायतीचा चार्ज देण्यासाठी बीडीओंकडे शिफारस करतो, त्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील तसेच दरमहा प्रोटोकाॅल म्हणून ५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी विस्तार अधिकारी सुनील पार्टे याने तक्रारदाराकडे केली. तर सेवा केंद्रातील ओंकार जाधव याने त्याच तक्रारदाराकडे ग्रामपंचायतीचे दप्तर, जमा खर्च, कीर्द, ग्रामपंचायत विभागाच्या पोर्टलवर ऑनलाइन क्लोजिंगसाठी १ हजार ५०० रुपयांची लाच मागितली.
या प्रकारानंतर संबंधित तक्रारदाराने साताऱ्यात येऊन लाचलुचपत विभागाकडे रितसर लेखी तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता दोघेही लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. महाबळेश्वर येथील पंचायत समिती परिसरात बुधवारी सायंकाळी लाचलुचपत विभागाने सापळा लावला.
त्यावेळी विस्तार अधिकारी सुनील पार्टे याला १५ हजारांची लाच स्वीकारताना तर सेवा केंद्राचा तालुका व्यवस्थापक ओंकार जाधव याला दीड हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. महाबळेश्वर पंचायत समितीमधील दोन अधिकारी लाच घेताना आढळून आल्याने महाबळेश्वरमध्ये प्रचंड खळबळ उडाली. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दोघांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुप्रिया गावडे, हवालदार नितीन गोगावले, नीलेश राजपुरे, नीलेश चव्हाण, अजयराज देशमुख आदींनी या कारवाईत भाग घेतला.