साताऱ्यात ‘मोक्का’तील गुंडांकडून सहा पिस्टल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:40 IST2025-06-07T15:39:57+5:302025-06-07T15:40:15+5:30

मोक्कामधून जामिनावर सुटले होते

Two inn goons arrested for selling pistols and live cartridges after breaking curfew after being released on bail from Mokka | साताऱ्यात ‘मोक्का’तील गुंडांकडून सहा पिस्टल जप्त

साताऱ्यात ‘मोक्का’तील गुंडांकडून सहा पिस्टल जप्त

सातारा : मोक्कामधून जामिनावर सुटताच तडीपारीचा भंग करत दोन सराईत गुंड पिस्टल व जिवंत काडतुसांची विक्री करीत होते. त्यासाठी ते लोणंद-नीरा मार्गावरील रेल्वे पुलावर आले. त्यावेळी सातारा एलसीबी व लाेणंद पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ पिस्टलसह १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमित ऊर्फ बिऱ्या कदम (रा. लोणी, ता. खंडाळा) व विशाल महादेव चव्हाण (रा. भोळी, ता. खंडाळा), अशी दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (दि. ५) मोक्कातून जामिनावर सुटलेले व जिल्ह्यातून तडीपार असलेले अमित ऊर्फ विऱ्या कदम व विशाल महादेव चव्हाण राखाडी रंगाच्या कारमधून (क्र. एमएच १२ टीएस १८८९) नीरा ते लोणंद मार्गावर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्यास येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी रोहित फार्णे यांना पथकासह जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

या पथकाने लोणंद ते नीरा मार्गावरील रेल्वे पुलावर सापळा लावून कारमधील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा पिस्टल, ३० काडतुसांसह १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोघांवरही लोणंद पोलिस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगून तडीपारीचा भंग केल्याप्रकरणी, तसेच भारतीय हत्यार अधिनियमानुसार गुन्हा नोंद केलेला आहे. पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर व रोहित फार्णे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

जप्त केलेला मुद्देमाल

कारवाईत सहा देशी बनावटीचे पिस्टल, ६ मोकळ्या मॅग्झिन्स, ३० जिवंत काडतुसे, २ मोबाइल हॅण्डसेट व कार, असा १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Two inn goons arrested for selling pistols and live cartridges after breaking curfew after being released on bail from Mokka