Satara: विवाहाच्या आमिषाने अत्याचार; अन् दुसरीसोबतच उरकला साखरपुडा, एकास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 13:07 IST2024-08-28T13:05:11+5:302024-08-28T13:07:00+5:30

पीडित मुलीची पोलिसात तक्रार

Tortured by the lure of marriage and had an affair with another Youth arrested | Satara: विवाहाच्या आमिषाने अत्याचार; अन् दुसरीसोबतच उरकला साखरपुडा, एकास अटक 

Satara: विवाहाच्या आमिषाने अत्याचार; अन् दुसरीसोबतच उरकला साखरपुडा, एकास अटक 

सणबूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तसेच मुलीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर तिची फसवणूक करून दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने याबाबतची फिर्याद ढेबेवाडी पोलिस ठाण्यात दिली असून, संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी विभागातील एका गावात राहत असलेल्या मुलीसोबत त्याच गावातील एका मुलाचे प्रेमसंबंध होते. दहावीच्या वर्गात शिकत असताना ते दोघेही एकाच वर्गात होते. तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. संबंधित मुलगी अल्पवयीन असताना मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. तसेच तिच्या घरात जाऊन तिच्यावर अत्याचार केला. काहीवेळा त्याने पीडित मुलीला आपल्या राहत्या घरी बोलावून तेथेही तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने त्याच्यामागे विवाहाचा तगादा लावल्यानंतर संशयिताने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच तिला तो टाळू लागला. 

मात्र, तरीही पीडित मुलगी विवाहासाठी त्याच्याकडे विचारणा करीत होती. अशातच संशयिताने गत महिन्यात दुसऱ्याच मुलीसोबत साखरपुडा करून पीडित मुलीची फसवणूक केली. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून ढेबेवाडी पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक शैलजा पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Tortured by the lure of marriage and had an affair with another Youth arrested