विवाहितेवर तिघांचा अत्याचार

By Admin | Updated: November 1, 2015 00:03 IST2015-10-31T23:35:37+5:302015-11-01T00:03:48+5:30

संशयितांना अटक : दीड वर्षापासून घृणास्पद प्रकार

Three tortured on marriage | विवाहितेवर तिघांचा अत्याचार

विवाहितेवर तिघांचा अत्याचार

औंध : जिवे मारण्याची व बदनामी करण्याची धमकी देत एका २३ वर्षीय विवाहितेवर तीन युवकांनी सातत्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात तीन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यातील दोघांना सातारा येथे, तर एकाला करांडेवाडी येथून अटक करण्यात आली.
औंध पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अजित अशोक करांडे (वय २९, रा. करांडेवाडी) हा गेल्या दीड वर्षापासून संबंधित पीडित महिलेला जिवे
मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करीत होता. त्यानंतर अक्षय ईश्वर करांडे (वय १९) व धीरज सुनील रजपूत (१९, दोघेही रा. करांडेवाडी, ता. खटाव) यांना ही बाब समजली. त्यानंतर अक्षय व धीरज यांनीही संबंधित विवाहितेला ‘तुझी बदनामी करू,’ अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे यांनी संबंधित पीडित महिलेची चौकशी केली. सहायक पोलीस निरीक्षक उदय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दादासाहेब देवकुळे अधिक तपास करीत आहेत. औंध पोलीस ठाणे हद्दीत अत्याचाराचा गुन्हा दाखल होण्याची गेल्या दोन महिन्यांमधील ही तिसरी वेळ आहे. (वार्ताहर)
पतीला दिली कल्पना !
गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेला हा प्रकार असह्य झाल्याने पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी पतीला याची कल्पना दिली. त्यानंतर हा घृणास्पद प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही तत्काळ अटक केली. न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Three tortured on marriage