सौर पथदिव्यांच्या बॅटरीवर चोरट्यांचा डोळा

By Admin | Updated: July 16, 2014 01:23 IST2014-07-16T01:17:21+5:302014-07-16T01:23:17+5:30

चाफळ विभाग : तक्रारी होऊनही पोलिसांचा तपास शून्य

The thieves eye on the solar street battery | सौर पथदिव्यांच्या बॅटरीवर चोरट्यांचा डोळा

सौर पथदिव्यांच्या बॅटरीवर चोरट्यांचा डोळा

चाफळ : विभागात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून चोरट्यांनी सौर पथदिव्यांच्या बॅटरीवर डल्ला मारण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांना हे भुरटे चोर सापडत नसल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
चाफळ विभागात २२ गावे व २३ वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. विभागाची भौगोलिक परिस्थीती पाहता बहुतांश गावे डोंगर माथ्यावर वसलेली आहेत. विभागाची लोकसंख्या २७ हजाराच्या आसपास आहे. राम मंदिरास पर्यटनाचा दर्जा मिळाल्यापासून येथे भाविकांची उपस्थीती लक्षनिय असते. यातच विभागाची मुख्य बाजारपेठ चाफळला असल्याने येथे दररोज विभागातील हजारो ग्रामस्थांची ये-जा असते. त्यामुळेच चाफळला पोलीस दुरक्षेत्र उभारण्यात आले आहे. उंब्रज पोलीस ठाण्याअंतर्गत या दुरक्षेत्राचा कारभार सुरु असतो.
विभागातील धायटी येथील बौध्दवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सौरउर्जा दिव्याची व नाणेगाव येथील महादेव मंदिर रस्त्यावरील सौरउर्जा दिव्यांच्या बॅटरी चोरुन नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत चाफळ पोलीसांत अज्ञातांविरोधात तक्रारीही नोंदवण्यात आल्या आहेत. मात्र चाफळ पोलिसांकडून तपास होत नसल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच येथील पोलीस दुरक्षेत्रास कायमस्वरुपी अधिकारी मिळत नाही. तसेच कर्मचारीही कमी असल्याने त्यांच्याकडून रात्रगस्त घातली जात नाही. (वार्ताहर)

Web Title: The thieves eye on the solar street battery