सातारकरांची चिंता मिटली; शहराला पाणीपुरवठा करणारे 'कास धरण ओव्हरफ्लो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:44 IST2022-07-16T11:44:08+5:302022-07-16T11:44:50+5:30
कास धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होऊन मागील महिन्यात पाणीपातळी मोठयाप्रमाणावर खालावून अगदी सात फुटावर आली होती.

सातारकरांची चिंता मिटली; शहराला पाणीपुरवठा करणारे 'कास धरण ओव्हरफ्लो'
सागर चव्हाण
पेट्री : शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने पुर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यावरून काल, शुक्रवारी मध्यरात्री मोठयाप्रमाणावर पाणी वाहून सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली. कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणीपातळीतही वाढ होऊन भांबवली, एकीव धबधबा मोठयाप्रमाणावर कोसळतानाचे चित्र आहे. यंदा धरणाचे काम पुर्ण होऊन नवीन सांडव्यावरून पाणी वाहतानाचे चित्र सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.
कास धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होऊन मागील महिन्यात पाणीपातळी मोठयाप्रमाणावर खालावून अगदी सात फुटावर आली होती. पाणीटंचाईची समस्या उद्भवण्यापुर्वीच मान्सुनच्या हजेरीने अतिवृष्टी होऊन चार फूटाने पाणी वाढले. नंतर आठवडाभर पाऊस मध्यम होऊन सरासरी दोन फूट व मुसळधार पावसात सरासरी चार फुटाने पाणीसाठ्यात वाढ होऊन शुकवारी मध्यरात्रीपर्यंत गतवर्षीपेक्षा साडेसव्वीस फुट अधिक पाणीसाठा होऊन तलावात एकूण साडेसेहेचाळीस फुट पाणीसाठा झाला आहे.