सोशल मीडियावर झाली ओळख, ‘त्यानं’ अश्लील फोटो मागितले ‘तिने’ पाठविलेही; अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 13:37 IST2022-05-27T13:11:47+5:302022-05-27T13:37:41+5:30
दोघांचं बिनसल्यानंतर त्यानं ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तिचे खासगी अश्लील फोटो मागितले. तिने भीतीपोटी ‘तसले’ फोटो त्याला पाठविलेही.

सोशल मीडियावर झाली ओळख, ‘त्यानं’ अश्लील फोटो मागितले ‘तिने’ पाठविलेही; अन्..
सातारा : एकमेकांची मैत्री झाल्यानंतर भान हरपून केलेले कृत्य अंगलट येते, तेव्हा डोळ्यासमोर काजवे चमकण्याऐवजी पोलीस दिसतात. असंच एका युवतीच्या बाबतीत घडलंय. सोशल मीडियावरून दोघांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीने हद्दच ओलांडली. त्यानं तिच्या खासगी अश्लील फोटोंची मागणी केली अन् तिने पाठविलेही. पण जेव्हा या दोघांचं बिनसलं, तेव्हा त्यांनं ‘तसले’ फोटो तिचा भाऊ, बहीण यांना पाठविले. यावरून संबंधित युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तरुणी २४ वर्षांची असून, साताऱ्यातील एका शोरूममध्ये ती नोकरी करत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची आणि पंढरपुरातील एका तरुणाची सोशल मीडियावरून ओळख झाली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्रीही झाली. भेटीदरम्यान दोघांनी एकत्र फोटोही काढले. मात्र, दोघांचं बिनसल्यानंतर त्यानं ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तिचे खासगी अश्लील फोटो मागितले. तिने भीतीपोटी ‘तसले’ फोटो त्याला पाठविलेही. पण एक चूक झाकण्यासाठी त्या तरुणीनं आपले खासगी फोटो पाठवून दुसरी चूक केली. पहिल्या धमकीवेळीच जर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असती, तर पुढचे बालंट टळले असते.
..तेव्हा तरुणीच्या पायाखालची वाळू सरकली
वाढता त्रास टाळण्यासाठी तिनं त्याचा नंबर आणि इन्स्टाग्राम अकौंट ब्लॉक केलं. त्यामुळे संतापलेल्या युवकानं तिचा चुलत भाऊ, बहीण यांच्या अकौंटवर ‘तसले’ फोटो पाठविले. तेव्हा त्या तरुणीच्या पायाखालची वाळू सरकली. तिने तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या युवकाच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने त्या युवकाचा शोध घेतला. मात्र, तो पंढरपूरचा रहिवासी असल्यामुळे तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला पकडण्यासाठी सातारा पोलिसांचे एक पथक पंढरपूरला रवाना झाले आहे.