Satara: चांदोलीत सोडलेली ‘तारा’ वाघिण आली पाटणच्या वाल्मीक पठारावर!, वनविभाग सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:12 IST2025-12-25T18:12:14+5:302025-12-25T18:12:36+5:30
लोकांमध्ये घबराट : घोटील-कसणी रस्त्यावर सकाळी सातला दर्शन

Satara: चांदोलीत सोडलेली ‘तारा’ वाघिण आली पाटणच्या वाल्मीक पठारावर!, वनविभाग सतर्क
सणबूर : वेळ सकाळी सातची... माईंगडेवाडी-ढेबेवाडी मुक्कामी एसटी बस माईंगडेवाडी येथून ढेबेवाडीकडे जात असताना घोटील-कसणी रस्त्याच्या ओढ्यावर एसटी आली असता डोंगरातून रस्त्यावर अचानक वाघिणीची एन्ट्री झाल्याने एसटी चालकासह प्रवाशांची घाबरगुंडी उडाली.
या रस्त्याने वाहतुकीबरोबरच माणसांचा सतत राबता असताे. अचानक वाघीण समोर आल्यावर काय अवस्था होईल, हे प्रत्यक्ष्यदर्शी असलेल्या लोकांनी सांगितले. या परिसरात अगोदरच वन्यप्राण्यांचा उपद्रव आहे. त्यातच आता वाघाचे आगमन झाल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वी वनविभागानेसांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यात सोडलेली ‘तारा’ वाघीण बुधवारी पाटण तालुक्यातील वाल्मीक पठाराच्या परिसरात पोहोचली. ही माहिती मिळताच वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी वाघिणीच्या गळ्यात असलेल्या काॅलर आयडीचा लोकेशनद्वारे माग काढला असता ती वांग-मराठवाडी धरणाच्या आसपास असल्याचे कळत आहे. या परिसरात वाघिणीचे दर्शन झाल्याने येथील लोक भयभीत झाले आहेत. पहिल्यांदाच वाघिणीचे दर्शन झाल्यामुळे घराबाहेर बाहेर पडणे अवघड झाले आहे.
आजपर्यंत वाघ ऐकून होतो. मात्र, आज प्रत्यक्षात पाहिले. त्याला बघितल्यावर काय अवस्था झाली, हे सांगणे अवघड आहे. अगोदरच गवे, बिबटे काही पाठ सोडत नाहीत. त्यामुळे येथे राहायचे कसे, असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. वनविभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा. - रमेश पवार, ग्रामस्थ, घोटील
चांदोली अभयारण्य सोडलेली ‘तारा’ नावाची दोन वर्षांची वाघीण आहे. ती चांदोली अभयारण्य येथून झोळंबी झडा येथून ती खाली आली आहे. तिचा आम्ही माग काढला असून, ती मानवी वस्तीत येत नाही. तिला ट्रॅक करण्यासाठी आमचे कर्मचारी त्या परिसरात आहेत. घोटील, निगडे, कसणी या परिसरातील लोकांनी या परिसरात जनावरे सोडून जाऊ नये. - किरण माने, वनक्षेत्रपाल