‘खोटे पोलिस’ खऱ्या पोलिसांना चक्क सापडेनात!, साताऱ्यात दिवसाढवळ्या वृद्धांना लुटतायत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:52 IST2025-06-04T16:52:31+5:302025-06-04T16:52:52+5:30
गल्लोगल्ली, पेठांमध्येही ‘त्यांचा’ वावर, केवळ सीसीटीव्हीत दिसताहेत

‘खोटे पोलिस’ खऱ्या पोलिसांना चक्क सापडेनात!, साताऱ्यात दिवसाढवळ्या वृद्धांना लुटतायत
सातारा : सातारा शहरामध्ये मागील काही वर्षांपासून खोटे पोलिस सक्रिय झाले असून, हे पोलिस खरे पोलिस आहेत, असे भासवून नागरिकांना लुटत आहेत. पळून गेल्यानंतर मात्र, त्यांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद होत आहेत. परंतु असे असतानाही खऱ्या पोलिसांना हे खोटे पोलिस कसे सापडत नाहीत, असा प्रश्न सातारकरांमधून उपस्थित केला जात आहे.
आम्ही पोलिस आहोत, एवढे दागिने कशाला घातले आहेत. पुढे चोऱ्या-माऱ्या होत आहेत. खून झाला आहे, अशी एक ना अनेक कारणे सांगून तोतया पोलिस वृद्धांकडील दागिने घेऊन पसार होत आहेत. दागिने पुडीत बांधण्याचे नाटक करून हातोहात दागिने लांबविले जात आहेत. मागील तीन वर्षांत केवळ सातारा शहर व परिसरामध्ये ११ घटना घडल्या आहेत. यातील दोन घटना उघडकीस आल्या होत्या. परंतु त्यानंतर पुन्हा चोरटे काही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
समाजामध्ये पोलिसांच्या वर्दीचा आजही चांगला धाक आहे. हे जाणून असलेल्या खोट्या पोलिसांनी वृद्धांना आपले लक्ष्य बनवले आहे. सकाळी किंवा संध्याकाळी घराबाहेर फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एकट्या-दुकट्या वृद्धांना वाटेत अडवून त्यांना आम्ही पोलिस आहोत, असे सांगून लुटले जात आहे. सातारा शहरात हे प्रकार विसावा नाका, शाहूपुरी, मंगळवार पेठ, गोडोली आदी परिसरात घडत आहेत.
मंगळवार पेठेत रविवारी सायंकाळी पाच वाजता भर वर्दळीच्या ठिकाणी एका ६५ वर्षीय वृद्धाला अशाच प्रकारे लुटण्यात आले. त्यांच्याकडील अंगठी व इतर दागिने घेऊन तोतया पोलिसांनी पलायन केले. या घटनेनंतर पोलिसांनी जिथे हा प्रकार घडला, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले. परंतु त्यांच्या दुचाकीचा नंबर मात्र, सीसीटीव्हीत अस्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
गल्लोगल्ली, पेठांमध्येही ‘त्यांचा’ वावर
सातारा शहरात सीसीटीव्हीचे जाळे आहे. असे असतानाही हे खोटे पोलिस अजून कसे सापडत नाहीत, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पोलिस असल्याचे भासवून वृद्धांना लुटणारे हे स्थानिकच असण्याची शक्यता आहे. गल्लोगल्ली, पेठांमध्ये त्यांचा वावर असल्याचे अनेकदा सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आले आहे.