Satara: कासवर यंदा ४ सप्टेंबरपासून फुलोत्सव..!, नियोजनासाठी जिल्हाधिकारी पोहोचले प्रत्यक्ष पठारावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 17:52 IST2025-09-01T17:52:09+5:302025-09-01T17:52:34+5:30
सीतेची आसवे, सोनकी, चवर, गेंद येण्यास सुरुवात

Satara: कासवर यंदा ४ सप्टेंबरपासून फुलोत्सव..!, नियोजनासाठी जिल्हाधिकारी पोहोचले प्रत्यक्ष पठारावर
पेट्री : कास पठाराच्या हंगामाची सुरुवात ४ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. याबाबतचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला. हंगामाच्या तयारीबाबत विविध विभागांतील अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी यांनी कास पठारावर जाऊन पाहणी केली.
कासच्या हंगाम नियोजनदृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली. सुटी दिवशी होणारी वाहतूक कोंडी व त्यामुळे पर्यटकांना होणारा त्रास विचारात घेऊन एकेरी वाहतुकीच्या पर्यायावर चर्चा झाली. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, विभागीय वनअधिकारी रेश्मा व्होटकर, सहायक वनसंरक्षक एच. डी. जगताप, सातारा, जावळी वनक्षेत्रपाल संदीप जोपळे, पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव, कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष संतोष आटाळे, उपाध्यक्ष विजय वेंदे, सदस्य प्रदीप कदम, दत्ता कीर्दत, विठ्ठल कदम, विमल शिंगरे, तानाजी आटाळे, सोमनाथ बुढळे उपस्थित होते.
हंगामाचे आगामी बुकिंग www.kas.ind.in या साइटवर सुरू केले आहे. यावर्षी सुटीच्या दिवशी फक्त ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या पर्यटकांनाच प्रवेश मिळणार आहे. ऑफलाइन येणाऱ्यांना प्रवेश मिळणार नसल्याने आगाऊ बुकिंग गरजेचे आहे. यासाठी प्रतिव्यक्ती दीडशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. गाइड फी दोनशे रुपये आहे. पार्किंग ते पठारापर्यंत पर्यटकांची ने-आण करण्याकरिता बस सुविधा समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
पठारावर पर्यटकांचा उपद्रव नियंत्रित करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. फुलांची नासधूस, इतर उपद्रव करणाऱ्यांना उपद्रव शुल्क आकारण्यात येणार आहे. स्वच्छतागृहांची संख्याही वाढविण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार सुविधा, व्यवस्था पाहण्यासाठी स्वयंसेवक नेमणूक व्यवस्था करण्यात आली आहे.
कास पठार, कास तलाव पार्किंगवरून पुढे अंधारी, कोळघर, सह्याद्रीनगरमार्गे मेढा सातारा किंवा कास तलाव-वांजूळवाडी-घाटाईमार्गे पुनः सातारा एकेरी वाहतुकीचा मार्ग निश्चित करण्यात आला. घाटाई मार्गावर वाजूंळवाडी गावच्या हद्दीत रस्ता खचला असून रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना वनविभाग, बांधकाम विभागाला दिल्या. खड्डे तत्काळ भरण्याविषयी सूचना वनविभाग, बांधकाम विभाग, कार्यकारी समितीला दिल्या.
पठारावरील पर्यटक, इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त दिला जाईल, असेही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. दरम्यान कुमुदिनी तलाव, कासाणी व कास तलावाजवळील पार्किंग, कास पठार आदींची पाहणी करीत जाताना घाटवन येथील घाटाई देवीचे दर्शन सपत्नीक घेतले.
सीतेची आसवे, सोनकी, चवर, गेंद येण्यास सुरुवात
सातत्याने पडणाऱ्या पावसाने फुले बहरायला उशीर झाला असला तरी आता पावसाने थोडीफार उघडीप दिल्याने पठारावर फुलांचे दर्शन होऊ लागले. ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्यास लवकरच पठार फुलांच्या गालिच्यांनी बहरणार आहे. पठारावर सद्य:स्थितीत तेरडा फुलायला लागला आहे. त्याचबरोबर सीतेची आसवे, सोनकी, चवर, गेंद, टोपली कारवी आदी फुले तुरळक स्वरूपात यायला सुरुवात झाली आहे.