मुख्यमंत्र्यांकडून सातारा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा चेंडू पुन्हा ‘राजे’ यांच्या कोर्टात!, दोन दिवसांची दिली मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:36 IST2025-11-12T15:34:52+5:302025-11-12T15:36:25+5:30
Local Body Election: अंतिम निवडीसाठी दोन दिवसांची मुदत

मुख्यमंत्र्यांकडून सातारा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा चेंडू पुन्हा ‘राजे’ यांच्या कोर्टात!, दोन दिवसांची दिली मुदत
सातारा : राज्याच्या सत्ताकारणाचे केंद्रस्थान बनलेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची आता मोठी राजकीय उत्सुकता आहे. नगरसेवक आणि सर्वांत महत्त्वाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची निवड करण्याची निर्णायक जबाबदारी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या खांद्यावर पडली आहे. मुंबईत मंगळवारी (दि. ११) झालेल्या पक्षाच्या बैठकीत यादी करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
भाजपने ही निवडणूक पारंपरिक आघाड्यांच्या जाळ्यातून बाहेर काढून थेट कमळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साताऱ्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सोमवारी घेतलेल्या मुलाखतीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली. नगराध्यक्ष पदासाठी २१, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ३८७ अशा एकूण ४०८ उमेदवारांनी आपली दावेदारी दाखल केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक प्रभारी शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाध्यक्ष तथा आमदार अतुल भोसले यांनी ही यादी घेऊन मंगळवारी थेट मुंबई गाठली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यादीवर अंतिम निर्णय अपेक्षित होता. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या इच्छुकांमधून प्रभागनिहाय समीकरणे जुळवून, योग्य उमेदवारांची निवड निश्चित करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. त्यामुळे, राजेंच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे दोन दिवसांची मुदत मागितली. आता प्रभागनिहाय उमेदवारांची छाननी करून यादीला अंतिम रूप देण्याचे काम शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे यांच्याकडे पुन्हा आले आहे. ही यादी पूर्ण झाल्यावरच ती पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मान्यतेसाठी सादर केली जाईल.
लवकरच खुलणार लखोटा..
सातारा पालिकेचे नगराध्यक्षपद अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. या पदासाठी अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावली असली, तरी साताऱ्याचा पुढील ‘कारभारी’ कोण असणार आणि कोणाच्या नावावर भाजपची अंतिम ‘मोहर’ उमटणार, याचा ‘लखोटा’ आता दोन दिवसांनंतरच उघडणार आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांच्या नजरा आता अंतिम यादीकडे लागल्या आहेत.