सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार, इच्छुकांकडून मागविले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:45 IST2026-01-09T16:43:45+5:302026-01-09T16:45:23+5:30
मोर्चेबांधणीसाठी एकाच दिवशी बैठका

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार, इच्छुकांकडून मागविले अर्ज
सातारा : जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत पक्षांच्या कार्यकर्ता बैठकांनंतर मिळू लागले आहेत. त्याचवेळी जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी भाजपदेखील इरेला पेटला असून महायुतीत जागावाटात सन्मानजनक वाटा मिळण्याची राष्ट्रवादीला शाश्वती वाटत नाही. त्यामुळे एकत्र लढायचे की महायुती? असा पेच आहे. आता भाजपसोबत तहाला बसताना आघाडीच्या नेत्यांशी संधान साधण्याची कसरत करावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या २५ वर्षांपासून जिल्ह्यावर पकड होती परंतु, आता ताकद विभागल्याची जाणीव दोन्ही राष्ट्रवादींच्या नेतृत्वाला आहे. वाईमध्ये राष्ट्रवादी पक्षाची (अजित पवार गट) मोठी ताकद आहे. कराड दक्षिण, कराड उत्तरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची ताकद विभागली आहे. माण-खटाव, फलटण विधानसभा मतदार संघातही पक्षाने ताकद वाढवली आहे; परंतु, या सर्व ठिकाणी भाजपने नेटवर्क मजबूत केले आहे. सातारा-जावलीतही बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे यांच्यामुळे भाजपाचा गड मजबूत आहे. पाटण, कोरेगावमध्ये शिंदेसेनेची मजबूत पकड आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषदेवरील वर्चस्व कायम राखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार की स्वतंत्र लढणार याची उत्सुकता लागली आहे.
भाजप सोबत घेईल काय ?
कार्यकर्त्यांचा भाजपविरोधी सूर आहे तरीही तुटेपर्यंत ताणले तर भाजपसाेबत घेईल का? याचा गंभीरपणे विचार पक्षाकडून होत आहे. त्यामुळे ज्याठिकाणी उमेदवार सक्षम तेथे जागेवर दावा करायचा आणि ज्या-त्या ठिकाणच्या स्थितीनुसार निर्णय घेण्याचेच सध्या तरी धोरण असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून समजत आहे.
एकत्र आल्यास फायदा कोणाचा
जागावाटपात सन्मानजनक वाटा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याचा पर्यायाचा विचार करण्यात येत आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस सध्या तरी बॅकफूटवर आहे. उद्धवसेनेची ताकदही जिल्ह्यात क्षीण आहे. त्यांच्याचसोबत आघाडी केल्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काय फायदा होणार याचा अंदाज पक्षाकडून घेतला जात आहे.
दोन्ही काँग्रेसच्या बैठकांमुळे चर्चा सुरू
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार) बैठक दि. ७ रोजी माजी सहकारमंत्री व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याच दिवशी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.