मुख्य बाजारपेठेतील कापड दुकानातून दहा लाखांचा मुद्देमाल लंपास, व्यापारी भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 14:21 IST2018-08-12T14:20:10+5:302018-08-12T14:21:34+5:30
शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले एक कापड दुकान फोडून चोरट्यांनी साड्या आणि ड्रेस मटेरीयल असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

मुख्य बाजारपेठेतील कापड दुकानातून दहा लाखांचा मुद्देमाल लंपास, व्यापारी भयभीत
कोरेगाव (सातारा) : शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले एक कापड दुकान फोडून चोरट्यांनी साड्या आणि ड्रेस मटेरीयल असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. भर बाजारपेठेतील या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून व्यापारी भयभीत झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव येथील व्यावसायिक ओसवाल यांचे साखळी पुलानजिक ‘पद्मावती सारीज’ नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले. यानंतर सकाळी दुकानात आले असता त्यांना दुकानाचे शटर उघडल्याचे आढळून आले. पाहणी केल्यानंतर दुकानात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानातून साड्या व ड्रेस मटेरियलसह सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत ओसवाल यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.