मुंबईत बसून सातारच्या कायदा सुव्यवस्थेची अंधारेंनी काळजी करू नये, शंभूराज देसाईंनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:06 IST2026-01-07T18:03:45+5:302026-01-07T18:06:06+5:30
'त्या ड्रग्ज प्रकरणाशी एकनाथ शिंदे व परिवाराचा संबंध नाही'

मुंबईत बसून सातारच्या कायदा सुव्यवस्थेची अंधारेंनी काळजी करू नये, शंभूराज देसाईंनी लगावला टोला
कराड : सातारा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अतिशय व्यवस्थित आहे. सुषमा अंधारे यांना मुंबईत माध्यमांसमोर बोलायला काय जातंय? असा उलट प्रश्न करीत आम्ही स्वतः जनमानसात असतो. त्यामुळे उगाच मुंबईत बसून सुषमा अंधारे यांनी साताऱ्याच्या कायद्या सुव्यवस्थेची काळजी करू नये, असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
कराड येथे मंगळवारी मंत्री देसाईंनी नगरपालिकेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर नगरपालिका आवारात मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची उपस्थिती होती.
देसाई म्हणाले, ‘कराड पालिका निवडणूक प्रचारादरम्यान लागेल ती मदत करणार व निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला होता. कराडकरांनी आमच्या पक्षाच्या राजेंद्रसिंह यादव यांना नगराध्यक्षपदी निवडून दिले आहे. म्हणूनच आज आढावा बैठक घेतली. त्यात यापूर्वी दिलेल्या निधींच्या कामाची काय स्थिती आहे याची माहिती घेऊन योग्य त्या सूचना केल्या.’
त्यामुळे निमंत्रण नव्हते
शासकीय आढावा बैठकीला भाजपच्या नगरसेवकांना निमंत्रण नव्हते, याकडे लक्ष वेधले असता मंत्री देसाई म्हणाले, ‘ही फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक होती. त्यामुळे नगराध्यक्ष होते, पण कोणत्याही नगरसेवकांना व्यक्तिगत निमंत्रण दिले गेले नव्हते.’
मग तुम्ही कसा तर्क लावताय?
ठाण्यात ''ते'' पापाचा पैसा वाटायला आलेत अशी टीका गणेश नाईक यांनी केली आहे. याबाबत मंत्री देसाई यांना छेडले असता, त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. मग तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारून कसा तर्क लावताय? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी केला.
ते दोघे भाऊ-बहीण आहेत
एकनाथ शिंदे म्हणजे ठाण्याचे रहमान डकैत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, अंधारे आणि राऊत हे दोघे भाऊ-बहीण आहेत. त्यांनी टीका करण्यापेक्षा आपली शिवसेना कितव्या नंबरला आहे हे तपासावे, असा सल्ला मंत्री देसाई यांनी दिला.
त्या ड्रग्ज प्रकरणाशी एकनाथ शिंदे व परिवाराचा संबंध नाही
सातारा जिल्ह्यात सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणातील ओंकार डिगे कुठे गायब झाला आहे? हे ड्रग्ज नेमके कोणाच्या रिसॉर्ट्सवर सापडले? असा सवाल सुषमा अंधारे करीत आहेत. याबाबत विचारले असता, त्या ड्रग्ज प्रकरणाशी एकनाथ शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांचा कुठलाही संबंध नाही. पोलिस त्याचा व्यवस्थित तपास करीत आहेत, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.