Satara: सज्जनगड घाटात एसटीचा अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:18 IST2025-09-05T15:18:03+5:302025-09-05T15:18:22+5:30
घाटातील साईडपट्ट्या खचल्या

Satara: सज्जनगड घाटात एसटीचा अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
सातारा : सज्जनगडहून साताऱ्यात काॅलेजच्या मुलांना घेऊन येणाऱ्या एसटीचालकाचे अचानक घाटात नियंत्रण सुटले. चालकाने प्रसंगावधान राखून एसटी दरीच्या बाजूला न नेता डोंगराच्या बाजूला नेली. यामुळे मोठा अनर्थ टळला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता सज्जनगड घाटात झाला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ठोसेघरहून एसटी गुरुवारी सकाळी साताऱ्याकडे येत होती. या एसटीमध्ये १० ते १५ महाविद्यालयीन मुले व मुली होती. एसटी सज्जनगड घाटात आल्यानंतर चालकाचे अचानक वळणावर नियंत्रण सुटले. चालकाने प्रसंगावधान राखून बस डाेंगराच्या बाजूला खोल खड्ड्यात घातली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घाटात एसटीचा अपघात झाल्याचे समजताच कारी गावातील अजय आढागळे, जीवन शिंदे, बापू मोरे तसेच गजवडी, सोनवडी गावांतील युवकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. काॅलेजच्या मुलांना एसटीतून सुखरूप बाहेर काढले. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताची सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
घाटातील साईडपट्ट्या खचल्या
सज्जनगड घाटातील साईडपट्ट्या खचल्या आहेत. या साईडपट्ट्यांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जिथे हा अपघात झाला. तेथून पुढे खोल दरी होती. त्यामुळे एसटीतील मुले भयभीत झाली होती.