चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून एसपी तुषार दोशी रजेवर : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:07 IST2026-04-01T14:06:51+5:302026-04-01T14:07:12+5:30
सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडप्रक्रियेदरम्यान घडलेल्या प्रकाराची सध्या प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून एसपी तुषार दोशी रजेवर : देवेंद्र फडणवीस
सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडप्रक्रियेदरम्यान घडलेल्या प्रकाराची सध्या प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, या चौकशीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी हे रजेवर गेले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही चौकशी कोणत्या एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून संपूर्ण घटनेचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा परिषद निवडीवेळी नेमके काय घडले, कोणत्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तसेच त्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व घटकांची तपासणी केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
ज्यांनी-ज्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवली आहे, त्यांचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल. चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडेल, असेही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही, तसेच कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, विविध स्तरांवरून सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.