सातारा जिल्ह्यातील जवान सोमनाथ सुर्वे यांना सेवा बजावताना वीरमरण, सहा महिन्यांनी होणार होते निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:27 IST2025-10-10T17:25:41+5:302025-10-10T17:27:29+5:30
त्यांना मध्यंतरी हवालदार पदावर बढती मिळाली होती

सातारा जिल्ह्यातील जवान सोमनाथ सुर्वे यांना सेवा बजावताना वीरमरण, सहा महिन्यांनी होणार होते निवृत्त
तांबवे : भारतीय सैन्य दलातील मराठा लाईट इंफन्ट्रीमध्ये कार्यरत असलेले जवान सोमनाथ शामराव सुर्वे (वय ४७) यांचे पंजाबमधील चंदीगड येथे सेवा बजावताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते मूळचे कराड तालुक्यातील आबईचीवाडी गावचे सुपुत्र होत. शुक्रवारी त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सोमनाथ सुर्वे हे गेली १८ वर्षे भारतीय सैन्यदलातील मराठा लाईट इंफन्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. त्यांना मध्यंतरी हवालदार पदावर बढती मिळाली होती. सहा महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. सध्या चंदीगडमध्ये ते सैन्यदलात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांना काल अचानक हृदयविकाराच्या धक्का बसला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. गावातील तरुण सैन्यदलात भरती व्हावे यासाठी ते सुटीवर आल्यावर नेहमी युवकांना मार्गदर्शन करत असत.
त्यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यानंतर आबईचीवाडीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे ग्रामस्थांनी सांगितले