साताऱ्यात क्रूरतेची परिसीमा; लोखंडी रॉडने दुकानदाराचे हातपाय मोडले, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:28 IST2025-09-04T15:21:10+5:302025-09-04T15:28:44+5:30
सीसीटीव्हीत घटना कैद

साताऱ्यात क्रूरतेची परिसीमा; लोखंडी रॉडने दुकानदाराचे हातपाय मोडले, कारण अस्पष्ट
सातारा: दुकान उघडण्यासाठी जात असताना अनोळखी दोघांनी अचानक लोखंडी राॅडने हल्ला करून दुकानदाराचे हातपाय मोडले. हल्लेखोरांनी क्रूरतेची परिसीमाच गाठली. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप समोर आले नाही. ही घटना दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता शाहूपुरीत घडली.
ज्ञानेश्वर चंद्रकांत जगदाळे (वय ४९, रा. चिंतामणी हाैसिंग सोसायटी, शाहूपुरी, सातारा) असे जखमी दुकानदाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर जगदाळे यांचे शाहूपुरीतील आझाद नगर बसस्टाॅपशेजारी फॅब्रिकेशनचे दुकान आहे. हे दुकान उघडण्यासाठी ते दुचाकीवरून जात होते. दुकानाजवळ पोहोचल्यानंतर दोन अनोळखी तरुण दुचाकीवरून तेथे आले. काही क्षणातच त्यातील एका तरुणाने त्यांच्या पायावर लोखंडी राॅड मारला. यामुळे जगदाळे खाली पडले.
त्यानंतर लगोलग दोन्ही तरुणांनी जगदाळे यांच्या हातावर आणि पायावर जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. केवळ हल्लेखोरांनी जगदाळे यांच्या हातापायांवरच लोखंडी राॅडने मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. जखमी जगदाळे यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झाले आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात दोन अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र गोवेकर हे अधिक तपास करीत आहेत.
सीसीटीव्हीत घटना कैद
दुकानदार जगदाळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही पाहून गुन्हेगारांची क्रूरता दिसून येते. त्यांच्यावर कोणत्या कारणातून व कोणी हल्ला केला, हे जगदाळे यांनाही माहिती नाही, असे पोलिस सांगताहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शाहूपुरी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.