शॉक लागलेल्या जनमित्राची मृत्यूशी झुंज अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:16+5:302021-04-01T04:40:16+5:30

आणे येथील नांगरे वस्तीवरील शेतीपंप लाईनला बिघाड झाला होता. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी इंद्रजितसह अन्य एक जनमित्र आणि वायरमन ...

Shocked Janmitra fails to cope with death | शॉक लागलेल्या जनमित्राची मृत्यूशी झुंज अपयशी

शॉक लागलेल्या जनमित्राची मृत्यूशी झुंज अपयशी

आणे येथील नांगरे वस्तीवरील शेतीपंप लाईनला बिघाड झाला होता. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी इंद्रजितसह अन्य एक जनमित्र आणि वायरमन हे तिघेजण सोमवारी (दि. २९) सकाळी आणे येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी रोहित्र बंद करून कोळेवाडी येथून आलेला विद्युतपुरवठा खंडित केला. त्यानंतर खांबावरील बिघाड दुरुस्तीसाठी इंद्रजित खांबावर चढला. मात्र, तांबवे येथील सबस्टेशनवरून त्या वाहिन्यांना वीजपुरवठा सुरूच होता. परिणामी, बिघाड दुरुस्तीसाठी खांबावर चढलेल्या इंद्रजितला विजेचा धक्का बसला. त्यामुळे तो खांबावरून खाली फेकला गेला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर सहकाऱ्यांनी तातडीने त्याला कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीन दिवस अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. खांबावर वीजपुरवठा सुरू असतानाही बंद असल्याचे सांगून इंद्रजितला खांबावर चढण्यास सांगण्यात आले. या निष्काळजीपणामुळेच इंद्रजितला जीव गमवावा लागला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली. अखेर पोलिसांनी या प्रकरणात कसून तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबतची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलिसांत झाली आहे.

फोटो : ३१इंद्रजित थोरात

कॅप्शन : मृत इंद्रजित थोरात

Web Title: Shocked Janmitra fails to cope with death