शिवशक्ती परिक्रमा यात्रा: पंकजा मुंढेंच्या स्वागताला फलटणमध्ये मोठी गर्दी, चोरट्यांनी पंधरा तोळ्याचे दागिने लांबविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 16:23 IST2023-09-06T16:10:18+5:302023-09-06T16:23:26+5:30
नसीर शिकलगार फलटण : राज्याच्या माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज फलटण येथे आली. ...

शिवशक्ती परिक्रमा यात्रा: पंकजा मुंढेंच्या स्वागताला फलटणमध्ये मोठी गर्दी, चोरट्यांनी पंधरा तोळ्याचे दागिने लांबविले
नसीर शिकलगार
फलटण : राज्याच्या माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज फलटण येथे आली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मोठा पोलिस बंदोबस्त असताना सुद्धा गर्दीचा फायदा घेत चोरट्याने तीन जणांच्या गळ्यातील जवळपास साडे पंधरा तोळ्याचे दागिने लंपास केले.
पंकजा मुंडे यांची राज्यात शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू असून आज फलटण शहरामध्ये यात्रेचे आगमन होताच क्रांतिसिंह नाना पाटील चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांचा ताफा थांबतात कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीभोवती गर्दी केली. गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने भाजपा डॉक्टर सेलचे फलटण शहराध्यक्ष डॉक्टर सुभाष गुळवे यांच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चेन, सांगवी (फलटण) महादेव कदम यांची तब्बल साडेदहा तोळ्याची चेन, पत्रकार पोपटराव मिंड यांची एक तोळ्याची चेन लंपास केली.
काही वेळाने संबंधिताच्या लक्षात ही बाब आली. यावेळी त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. मात्र अज्ञात चोरटा सापडला नाही. उपस्थित काही कार्यकर्त्यांनी काढलेले फोटो तसेच व्हिडिओ तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.