Satara Crime: हनीट्रॅपचा झाला पर्दाफाश; अपहरणकर्त्या तथाकथित पत्रकार, मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:22 IST2025-11-12T15:22:21+5:302025-11-12T15:22:21+5:30
चॅटिंग करून महिला बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर भेटायला बोलावले

Satara Crime: हनीट्रॅपचा झाला पर्दाफाश; अपहरणकर्त्या तथाकथित पत्रकार, मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
शिरवळ (जि. सातारा) : फलटण तालुक्यातील एका ३५ वर्षीय तरुणाला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढणाऱ्या तथाकथित पत्रकार, तडीपार युवक व मनसे खंडाळा तालुकाध्यक्षासह तिघांना शिरवळ पोलिसांनी नुकतीच अटक केली असून न्यायालयाने १२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तथाकथित पत्रकार किरण प्रकाश मोरे (मूळ, रा. कर्नावड, ता. भोर, पुणे, सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा), सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला विशाल महादेव जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंडाळा तालुकाध्यक्ष इरफान दिलावर शेख (दोघेही रा. शिरवळ, ता. खंडाळा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांना दि. १२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फलटण तालुक्यातील ३५ वर्षीय युवकाला २० ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर चॅटिंग करून महिला बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर त्याला वीर धरण परिसरात भेटायला बोलावले. संबंधित युवक कारने त्या ठिकाणी भेटायला गेला. त्यावेळी तेथे वरील तिघे होते. संशयितांनी त्या तरुणाला त्याच्याच कारमध्ये बसवले. त्याचे अपहरण करून त्याला फायबर काठीने, हाताने, तोंडावर पाठीवर जबर मारहाण केली.
घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर ॲट्राॅसिटी व विनयभंग, अत्याचाराचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची भीती घातली. तसेच खंडणीस्वरूपात कार नावावर करून देण्यास सांगितले. या प्रकारानंतर संबंधित तरुणाला त्यांनी सोडून दिले.
तो जखमी झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होता. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याने हनीट्रॅपमध्ये आरोपींनी नेमके कसे अडकवले, याची तक्रार पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
‘ती’ महिला कोण?
फलटण तालुक्यातील तरुणाला दूरध्वनीद्वारे हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविणारी ती महिला कोण? हे पुढे येणे गरजेचे असून, याचा शोध घेण्याचे आव्हान शिरवळ पोलिसांसमोर आहे.