शिंदे, रामराजेंना कॉँग्रेसचा झटका!

By Admin | Updated: September 13, 2014 00:02 IST2014-09-12T23:57:39+5:302014-09-13T00:02:16+5:30

निषेधाचा ठराव : ‘आधी स्वत:च्या तालुक्यातील आकडेवारी बघा, मग दुसऱ्यांची चिंता करा !’

Shinde, Ramrajenna Congress blow! | शिंदे, रामराजेंना कॉँग्रेसचा झटका!

शिंदे, रामराजेंना कॉँग्रेसचा झटका!

सातारा : ‘रामराजे वयाने मोठे असले तरी राजकारणातील माझे वय त्यांच्यापेक्षा अधिक आहे. युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना मीच त्यांच्या भावाला सभापती केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत बोलताना त्यांनी प्रत्येक शब्द जपून वापरावा,’ असा जोरदार पलटवार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांनी केला, तर ‘स्वत:च्या फलटणमध्ये विधानसभेला काय होणार, इकडं नीट लक्ष द्या. उगाचच आमच्या कऱ्हाड दक्षिणची काळजी करू नका,’ असा खणखणीत टोलाही अविनाश नलवडे यांनी रामराजेंना लगावला.
‘कऱ्हाड दक्षिणमध्ये मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीची ताकद दाखवावीच लागेल’, असे विधान काल, गुरुवारी रामराजे यांनी केले होते, तर ‘काँग्रेसकडून कुरघोडी झाली तर राष्ट्रवादी तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देईल,’ असा सज्जड दम मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिला होता. रामराजे आणि शिंदे यांच्या या वक्तव्यांची दखल जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज, शुक्रवारी गंभीरपणे घेतली. काँग्रेस भवनात तातडीने बोलाविण्यात आलेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांवर जोरदार आगपाखड केली.
काँग्रेस पदाधिकारी पहिल्यांदाच आक्रमक झाले होते. बैठकीत मंत्री शिंदे आणि रामराजे यांच्या निषेधाचा ठराव विजयराव कणसे आणि भीमराव पाटील यांनी मांडला. त्याला मोहन जाधव आणि अविनाश नलवडे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी आनंदराव पाटील म्हणाले, ‘रामराजे आणि शिंदेंनी मुख्यमंत्र्यांची काळजी करू नये. ते कऱ्हाडमधून लढणारच आहेत. मात्र, या दोन मंत्र्यांना बाबांची खूपच काळजी वाटत असेल तर त्यांच्यापैकी एकाने येथून लढूनच दाखवावे; कारण त्या दोघांचीही कामे आणि कर्तबगारी आम्हाला चांगली ज्ञात आहे. ’ (प्रतिनिधी)

Web Title: Shinde, Ramrajenna Congress blow!