Satara: मलकापुरात उड्डाणपुलावरील सिगमेंट लाँचर उतरवण्यास सुरुवात, शिवछावा चौकात भली मोठी क्रेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:53 IST2025-09-10T18:53:29+5:302025-09-10T18:53:46+5:30
अचानक वाहतुकीत बदल केल्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम

Satara: मलकापुरात उड्डाणपुलावरील सिगमेंट लाँचर उतरवण्यास सुरुवात, शिवछावा चौकात भली मोठी क्रेन
मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर हद्दीत उड्डाणपुलासाठी वापरलेले सिगमेंट लाँचर मशीन उतरवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी मंगळवारी शिवछावा चौकात भली मोठी क्रेन लाँच केली आहे. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला. अचानक वाहतुकीत बदल केल्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन काहीकाळ वाहतूक कोंडी झाली हाती.
येथील युनिक उड्डाणपुलाचे सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी वापरलेले सिगमेंट लॉन्चर मशीन उतरवण्याचे काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. हे मशीन उतरवण्याचे काम पंधरा दिवस चालणार आहे. यासाठी शिवछावा चौकातील जागा निश्चित केली आहे. हा परिसर अतिशय वर्दळीचा असल्याने प्रशासनाकडून दोनवेळा चाचणीचा निर्णय घेण्यात आला होता.
लाँचर उतरवण्याचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली जात आहेत. त्यानुसार काही दिवसांपूर्वी शिवछावा चौकात पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, अदानीचे मुकेश, डी. पी. जैनचे नागेश्वर राव, राजीव बक्षी, सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक बदलाची चाचणी घेण्यात आली होती.
गणेश उत्सवामुळे मशीन उतरवणे थांबवले होते. गणपती गेल्यावर सोमवारी रात्रीच भली मोठी क्रेन चौकात आणली आहे. त्यासाठी मंगळवारी शिवछावा चौकात वाहतुकीत बदल करण्यात आला. दिवसभर क्रेन बसवणे व वाहतूक चाचणी करून रात्री लॉन्चर मशीन उतरवण्यास सुरुवात होणार आहे.
शिवछावा चौकात छेदरस्त्यासह एक मार्ग बंद
शिवछावा चौकात एक मार्ग बंद करून ढेबेवाडीकडे जाणारी व येणारी वाहतूक दुभाजक लावून एकाच बाजूने सुरू केली आहे, तर चौकातील छेदरस्ता बंद केला आहे. त्यासाठी चौकाच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर यु-टर्न तयार केले आहेत. महामार्गावरील वाहतूक स्लिप रोडवरून वळवली आहे.