गॅलरीत वाळत घातलेले कपडे काढताना तोल गेला, साताऱ्यात इमारतीवरुन पडून शाळकरी मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:36 IST2025-09-02T12:36:20+5:302025-09-02T12:36:32+5:30
गॅलरीला सुरक्षा जाळी नव्हती

गॅलरीत वाळत घातलेले कपडे काढताना तोल गेला, साताऱ्यात इमारतीवरुन पडून शाळकरी मुलीचा मृत्यू
सातारा : गॅलरीत वाळत घातलेले कपडे काढत असताना तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने समृद्धी प्रवीण मोरे (वय १२, रा. समृद्धी अपार्टमेंट पिरवाडी, बाॅम्बे रेस्टाॅरंट, चाैक परिसर, सातारा) या मुलीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी पिरवाडी येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गॅलरीमध्ये वाळत घातलेले कपडे काढून आण, असे तिच्या आईने सांगितले. कपडे काढत असतानाच तिचा तोल गेला. यामुळे ती दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. तिला तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान तिचा सायंकाळी मृत्यू झाला. समृद्धी ही साताऱ्यातील एका शाळेत सातवी इयत्तेत शिकत होती. या घटनेची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योत्स्ना भालेकर अधिक तपास करीत आहेत.
गॅलरीला सुरक्षा जाळी नव्हती
ज्या इमारतीमधून समृद्धी खाली पडली. त्या इमारतीच्या गॅलरीला सुरक्षा जाळी नव्हती. नेमकी ती कशी पडली, याचा तपास आता पोलिस करत आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.