Satara ZP Election 2026: कराड तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीतच मुख्य लढत !, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 19:57 IST2026-01-24T19:56:07+5:302026-01-24T19:57:20+5:30
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; यश मिळणार कोणाला ?

Satara ZP Election 2026: कराड तालुक्यात भाजप-राष्ट्रवादीतच मुख्य लढत !, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
प्रमोद सुकरे
कराड : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कराड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. अर्ज दाखल करणे, छाननी या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आतापर्यंतची सगळी परिस्थिती पाहता तालुक्यात भाजप विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस अशीच मुख्य लढत होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या आता यश मिळणार कोणाला? हे पाहावे लागणार आहे.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराड तालुक्याला मोठी राजकीय परंपरा आहे. येथील पंचायत समिती सभापतीपद अनेक मातब्बरांनी भूषवलेले आहे. त्यामुळे येथील सभापतीपदाला अनन्य साधारण असे महत्त्व राहिले आहे. त्यामुळे पंचायत समितीसह जिल्हा परिषद निवडणुकीत सध्या भलतीच रंगत वाढली आहे.
कराड तालुक्याच्या राजकारणात आजवर काँग्रेस विचाराचा प्रभाव राहिला आहे. मात्र, गत विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण व उत्तर अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघांत भाजपने परिवर्तनाचे ‘कमळ’ फुलवले आहे. त्यामुळे आता पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा फडकवण्याचा व जिल्हा परिषदमध्ये सत्ता आणण्यासाठी मोठा वाटा उचलण्याचे नियोजन दोन्ही आमदारांनी चालवले आहे. भाजपचा हा वारू थोपवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित येत चांगले आव्हान उभे केले आहे. त्याला इतर पक्षांचीही साथ मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यास किती व कसे यश येईल हे नजीकच्या काळात समजेलच.
काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष !
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या कराड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह १३ ठिकाणी काँग्रेसचे स्वबळावर उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांच्या ‘हाता’ला त्यावेळी काहीच लागलेले नाही. त्यामुळे होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची नेमकी भूमिका काय राहणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. अर्ज माघारी नंतरच याबाबतची स्पष्टता येणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदावर डोळा
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. कराड तालुक्यातील काले व विंग या दोन्ही गटांत ओबीसी महिला आरक्षण पडले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही जिल्हा परिषद गट कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी या दोन्ही मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.
कराड तालुक्यात काही ठिकाणी शिंदेसेनेने उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर, काही ठिकाणी त्यांनी एबी फार्म दिलेले नाहीत. या निवडणुकीत नेमकी त्यांची पडद्यामागून काय भूमिका राहणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.