"बापू शिंदेंना जिवंत सोडणार नाही"; देसाई-मांडवेंच्या त्या धमकीने खळबळ; पोलिसांनी सांगितले राड्याचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:32 IST2026-03-24T09:25:33+5:302026-03-24T09:32:06+5:30
सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी आपला अहवाल एसआयटीकडे सोपवला आहे.

"बापू शिंदेंना जिवंत सोडणार नाही"; देसाई-मांडवेंच्या त्या धमकीने खळबळ; पोलिसांनी सांगितले राड्याचे कारण
Satara Zilha Parishad Clash: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. याप्रकरणी सातारा पोलिसांनी आपला सविस्तर अहवाल विशेष तपास पथकाला सादर केला असून, त्यामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. नवनिर्वाचित सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी केवळ आक्रमक पवित्राच घेतला नव्हता, तर निवडणूक प्रक्रिया कशी होते तेच बघतो अशी उघड धमकी देत अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पराभवाच्या भीतीने आक्रमक?
पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार, अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना आपला पराभव निश्चित असल्याची खात्री पटली होती. पराभवाच्या धास्तीने हे दोन्ही नेते प्रचंड आक्रमक झाले होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्याऐवजी ती उधळून लावण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता. जर वेळीच त्यांना ताब्यात घेतले नसते, तर सभागृहात मोठी हिंसा किंवा गंभीर प्रकार घडला असता, असे पोलिसांनी म्हटले आहे.
"बापू शिंदेंनी गेम केलाय, त्यांना सोडणार नाही"
अहवालातील सर्वात खळबळजनक भाग म्हणजे या नेत्यांनी दिलेली जीवे मारण्याची धमकी. "कामेश कांबळेने आपल्याला धोका दिलाय आणि बापू शिंदे सुद्धा आपल्याला मतदान करेल याची शाश्वती नाही. उलट शिंदेंनीच आपल्या मुलाकरवी आपला गेम केलाय. त्यांना आता जिवंत सोडणार नाही," अशी टोकाची भाषा देसाई आणि मांडवे वापरत असल्याचे पोलिसांनी नमूद केले. निवडणूक झाली नाही तरी चालेल, पण निवडणूक कशी होते तेच बघतो. सभागृहात पोलीस राहणार नाहीत हे लक्षात ठेवा, अशी उघड दमबाजी त्यांनी केल्याचे समोर आले आहे.
मंत्र्यांचा 'गैरसमज' अन् पोलिसांची ओढाताण
घटनेच्या दिवशी चौथ्या मजल्यावर प्रचंड तणाव होता. देसाई आणि मांडवे पोलिसांनी पोलिसांना उद्देशून, "आमच्या नेत्यांना का अडवता?" असा सवाल केला. त्याचवेळी ते उपस्थित पालकमंत्र्यांना सांगत होते की, या सर्व प्रकाराला बापू शिंदेच जबाबदार आहेत. पोलिसांनी या दोन्ही नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि विनंती केली की त्यांनी शांततेत मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा.
मात्र, जेव्हा पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून त्यांना बाजूला नेले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या मंत्र्यांचा असा गैरसमज झाला की पोलीस त्यांना अटक करून घेऊन जात आहेत. त्यामुळे मंत्र्यांनीच त्यांना पोलिसांच्या तावडीतून ओढून सभागृहाकडे नेण्यास सुरुवात केली.
'ताब्यात घेणे अनिवार्य होते'; पोलिसांचा दावा
सभागृहात हे नेते गेले असते तर तिथे गंभीर राडा झाला असता, हे ओळखून पोलिसांनी त्यांना तात्पुरते ताब्यात घेतले होते. "आम्ही त्यांना वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कशाचीही दाद दिली नाही. उलट त्यांची आक्रमक वृत्ती वाढतच होती," असे पोलिसांनी अहवालात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी साताऱ्यात राजकीय अपहरणनाट्य घडलं. महाबळेश्वर पोलीस ठाण्यात मध्यरात्री अनिल देसाई व संदीप मांडवे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निवडणुकीच्या दिवशी सकाळी अनिल देसाई व संदीप मांडवे यांना पोलिसांनी निवडीच्या काहीक्षण आधी ताब्यात घेतले.