Satara News: शिरवळला नीरा नदीपात्रात आढळला मानवी सांगाडा, परिसरात उडाली एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:52 IST2023-03-08T13:52:06+5:302023-03-08T13:52:46+5:30
शिरवळ पोलिसांकडून तपास सुरू

Satara News: शिरवळला नीरा नदीपात्रात आढळला मानवी सांगाडा, परिसरात उडाली एकच खळबळ
शिरवळ : येथील गोलघुमटाजवळील नीरा नदीपात्रात सडलेल्या अवस्थेमध्ये मानवी पुरुष जातीचा सांगाडा आढळून असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित सांगाडा ३० ते ३५ वयोगटातील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
घटनास्थळ व शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ हद्दीमध्ये मांड ओढ्याच्या पुढे नीरा नदीपात्रामध्ये नीरा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाणी उपसा करणारी मोटर पाण्यामध्ये टाकण्याकरिता एक शेतकरी नीरा नदीपात्रात उतरला होता. यावेळी मोटरची पाहणी करत असताना संबंधित शेतकऱ्याला नीरा नदीपात्रातील डोहात एक मानवी सांगाडा सडलेल्या अवस्थेमध्ये निदर्शनास आला.
त्यानुसार संबंधित शेतकऱ्याने तातडीने शिरवळ पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानंतर शिरवळचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलिस अंमलदार संजय सकपाळ, छगन शेडगे, शिवराज जाधव यांनी शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
त्याठिकाणी संपूर्ण सडलेल्या अवस्थेमध्ये मानवी सांगाडा असल्याचे व त्याच्या हातामध्ये दोरा असल्याचे आढळून आले. यावेळी शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती पवार यांनी घटनास्थळीच संबंधित सांगाड्याची उत्तरतपासणी केली. संबंधित मृतदेह कोणाचा आहे, याबाबतचा तपास शिरवळ पोलिसांकडून सुरू आहे. शिरवळ पोलिस ठाण्यात याची नोंद झाली असून, पोलिस अंमलदार छगन शेडगे तपास करीत आहेत.