Satara Accident: ट्रकचे चाक तोंडावरून गेल्याने तरुण जागीच ठार, एमआयडीसीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:48 IST2025-12-04T15:48:34+5:302025-12-04T15:48:52+5:30
एक जण जखमी, अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला

Satara Accident: ट्रकचे चाक तोंडावरून गेल्याने तरुण जागीच ठार, एमआयडीसीतील घटना
सातारा : दुचाकीवरून देगाव फाट्याकडे जात असताना, पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुणाच्या तोंडावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण किरकोळ जखमी झाला. हा अपघात दि. २ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता देगाव-सातारा रस्त्यावर, परफेक्ट कंपनीसमोर झाला. अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव ओंकार जयवंत गवळी (वय २०, रा.भोसले कॉलनी, कोडोली, सातारा) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश प्रशांत माने (वय २२, रा.कोडोली, सातारा) आणि ओंकार गवळी हे दोघे दुचाकीवरून देगाव फाट्याकडे जात होते. प्रथमेश दुचाकी चालवत होता आणि ओंकार पाठीमागे बसलेला होता. परफेक्ट कंपनीसमोर पोहोचल्यावर, पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ओंकारच्या तोंडावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर प्रथमेशला ट्रक काही अंतर फरपटत नेले.
अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळावर जमलेल्या नागरिकांनी दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी ओंकारला तपासल्यानंतर मृत घोषित केले, तर प्रथमेशवर प्राथमिक उपचार करून नंतर त्याला घरी सोडण्यात आले. सातारा शहर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करत आहेत.
त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची
ओंकारची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. तो एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक लहान भाऊ आहे. घरातील कर्ता मुलगा मृत्युमुखी पडल्याने आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोडोली परिसरातील नागरिकांनी ट्रक चालकाला शोधून त्याच्यावर योग्य कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.