- जगदीश कोष्टी, साताराशिरवळ : प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून परप्रांतीय तरुणावर आधी जेवणाच्या डब्याने हल्ला करण्यात आला. त्यानंतर कालव्यात ढकलून देत खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना शिरवळ येथील दत्तनगर येथील निर्मनुष्य असलेल्या नीरा-देवघर कॅनॉलजवळील पायवाटेवर सोमवारी (१९ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. शिरवळ पोलिसांनी अवघ्या एक तासामध्ये पर्दाफाश करीत संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रदीप रामाश्रय सिंग (वय ३१, सध्या रा. दत्तनगर, शिरवळ, मूळ रा. जिगरसंडी, ता. जहानागंज, जि. आजमगढ, उत्तर प्रदेश), असे खून झालेल्या तरुणाचे, तर जितेंद्रकुमार राजमन गौतम (२०, सध्या रा. दत्तनगर, शिरवळ, मूळ रा. दुर्गोलीकला, बदलापूर, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वाचा >>"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रदीप सिंग व जितेंद्रकुमार गौतम हे दोघे एकत्र राहत होते. सोमवारी काम संपल्यानंतर दोघांनी दारू विकत घेतली आणि दोघेही ती प्यायले. त्यानंतर दोघेही साडेनऊच्या सुमारास घरी निघाले.
प्रेम संबंधावरून वाद झाला अन्...
नीरा-देवघर कॅनॉलजवळील पायवाटेवरून जात असताना जितेंद्रकुमार गौतम याने प्रदीप सिंग याच्याबरोबर प्रेमसंबंधावरून वाद घातला. प्रेमसंबंधास तो अडथळा ठरत असल्याच्या रागातून प्रदीप सिंग याच्या डोक्यात त्याने स्टीलच्या डब्याने मारहाण केली.
त्यानंतर नीरा-देवघर कॅनॉलमध्ये त्याला ढकलून दिले. त्याची हालचाल बंद होईपर्यंत जितेंद्रकुमार हा घटनास्थळी १५ ते २० मिनिटे थांबून होता. तो मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने दोघांचे मोबाइल काही अंतरावर फोडले.
तिघांनी लुटल्याचा रचला बनाव
तेथून काही अंतरावर राहत असलेल्या नातेवाइकांजवळ तो गेला. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लुटले. मी पळून आल्याचे त्याने नातेवाइकांना सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच फलटणचे पोलिस उपविभागीय अधिकारी राहुल धस, शिरवळचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील शेळके, सहायक पोलिस निरीक्षक महादेव सीद तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.
असा झाला उलगडा...
शिरवळ पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला. मृत प्रदीप सिंग याच्याबद्दल माहिती घेत असताना जितेंद्रकुमार गौतम याच्या बोलण्यात विसंगती व परिस्थितीवरून काही तरी वेगळे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामुळे संशय अधिकच बळावला. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. खुनाचा उलगडा होताच शिरवळ पोलिसांनी जितेंद्रकुमार याला अटक केली.