कुडबुडीचे राजकारण करणाऱ्यांविरोधात बोलणारच, रोहित पवारांनी ग्रामविकासमंत्र्यांना दिला इशारा
By नितीन काळेल | Updated: May 19, 2025 19:13 IST2025-05-19T19:13:01+5:302025-05-19T19:13:40+5:30
पोलिसांनीही घरगड्यासारखे काम करु नये

कुडबुडीचे राजकारण करणाऱ्यांविरोधात बोलणारच, रोहित पवारांनी ग्रामविकासमंत्र्यांना दिला इशारा
सातारा : पद असतानाही राज्यात न फिरता गावात राहून कुडबुड आणि दहशतीचे राजकारण करणाऱ्यांविरोधात आम्ही बोलणारच. त्यामुळे पत्रकार तुषार खरात आणि आणि संबंधित महिलेला न्याय देणारच आहे. त्यांनी इशारा त्यांच्या नेत्यांना द्यावा, आम्हाला नको, असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना दिला. तसेच पोलिसांनीही घरगड्यासारखे काम करु नये. वेळ आणि दिवसही कायम राहत नाहीत, असेही स्पष्ट केले.
सातारा येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेसाठी आमदार रोहीत पवार आले होते. या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी राजकीय प्रश्नांना उत्तरे दिली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याबाबत वकिली करु नये, असे आपल्याला म्हटल्याचा प्रश्न पत्रकारांनी रोहित पवार यांना केला. यावर त्यांनी आम्हाला योग्य वाटते ते बोलणारच.
पण, जे पदाचा लोकांसाठी वापर करत नाहीत. त्यांना लोकही विचारत नाहीत. पद असतानाही राज्यात न फिरता गावात राहून राजकारण करतात. त्यांच्याविरोधात बोलणारच. पत्रकार तुषार खरात आणि महिला तसेच देशमुख परिवाराचा प्रश्न आहे. देशमुख परिवाराची संस्था गोरेंनी ताब्यात घेतली. कोरोना काळात नफेखोरी झाली, जमीन बळकावली. हे विषय बाहेर येणारच. लोकांना हे सर्व माहीत आहे. पण. दहशतीमुळे कोणी बोलत नाही.
सत्य लोकांपर्यंत आणणारच
मंत्री असल्याने पोलिसही अधिकार असतानाही घरगड्यासारखे काम करत आहेत. वर्दीत राहून चुकीचा प्रकार सुरू आहे. तरीही आम्ही संबंधितांना न्याय देणारच आहोत. आम्ही सत्य लोकांपर्यंत आणणारच. गुंड बाहेर आणि सर्वसामान्य माणसे जेलमध्ये हे बरोबर नाही. एका प्रकरणात तुषार खरात यांना जामीन मिळाला आहे. संबंधित महिलेलाही जामीन मिळेल. याप्रकरणात पोलिसांकडूनही दबाव आणण्याचे काम होत आहे. तसेच त्यांनीही पदाचा उपयोग विकासासाठी करावा. पोलिसांना घेऊन दडपशाही करु नये. आम्ही वकिलांच्या संपर्कात आहोत. त्यानंतर लोकांत जाणार आहोत, असेही आमदार राेहित पवार यांनी स्पष्ट केले.
दोन राष्ट्रवादी एकत्रची चर्चाच; निवडणुका दिवाळीनंतर..
पत्रकारांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी चर्चा सुरू असल्याचा प्रश्न केला. यावर रोहित पवार यांनीही एकत्र येण्याची चर्चाच सुरू असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि दुसरीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार काही संवाद करत नाहीत तोपर्यंत चर्चाच राहील, असेही सांगितले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील अशी चर्चा आहे. खासदार संजय राऊत यांचे पुस्तक पाहिले अन् वाचलेही नाही. त्यामुळे त्याविषयी खोलात जाऊन बोलता येणार नाही, असेही पत्रकारांच्या प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट केले.