सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला विश्रांती; पूर्वेला धो-धो बरसला, रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 14:49 IST2025-05-26T14:48:36+5:302025-05-26T14:49:55+5:30
माणगंगा, बाणगंगा दुथडी भरून, बाणगंगा धरण ७५ वर्षांत प्रथम मे महिन्यात भरले

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला विश्रांती; पूर्वेला धो-धो बरसला, रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला
सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सातारा, महाबळेश्वर, वाई, पाटण तालुक्यात पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून सरी कोसळत होत्या, तर पूर्वेच्या दुष्काळी माण, खटाव, फलटणमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे माणगंगा, बाणगंगा, येरळा नद्या दुथडी भरून वाहात होत्या. त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दहिवडीवरून कुळकजाईकडे जाणारा रस्ता शिंदी खुर्द येथे बंद होता. तो तात्पुरता तयार करण्यात आला. मात्र, रविवारी तो पुन्हा वाहून गेला. परकंदीतून मलवडीकडे येणारे पूल पाण्याखाली गेले होते, तर माणगंगा नदीतून आंधळीकडे, आंधळीतून दहिवडीकडे येणारे दोन्ही पूल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. माणगंगा नदी दुथडी भरून वाहात होती. आंधळी धरण रविवारी भरले.
फलटण तालुक्यात सलग पाचव्या दिवशी पाऊस पडत आहे. त्यामुळे फलटण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साठल्याने फलटण तुंबले होते. पालिकेने नालासफाई व्यवस्थित न केल्याने अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दत्तनगर, मलटन, इंदिरानगर या ठिकाणी अनेक कुटुंबांना रात्र जागून काढावी लागली. घरात पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तूंचे नुकसान झाले. पालखी मार्गावरून पाणी वाहात असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.
बाणगंगा धरण ७५ वर्षांत प्रथम मे महिन्यात भरले
वाठार निंबाळकर : फलटण तालुक्यामध्ये मे महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्ते ओढ्यांना आलेल्या पुरामुळे बंद झालेले आहेत. बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे उपळवे ते सावंतवाडी हा रस्ता बंद पडला आहे. याच बाणगंगा नदीच्या पुरामुळे कुरवली - माळेवाडी रस्ता बंद झाला आहे. १९५१मध्ये दिवंगत मालोजीराजे नाईक - निंबाळकर यांनी बांधलेल्या बाणगंगा नदीवरील बाणगंगा धरण इतिहासात कधीही मे महिन्यात भरलेले नव्हते. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या सांडव्यावरून बाहेर पडले. पाण्यामुळे बाणगंगा नदीला पूर आला आहे.
फळांचे गाव धुमाळवाडीला फटका
राज्यात घोषित झालेले फळांचे गाव धुमाळवाडी गावात ढगफुटीसदृश पाऊस पडला. ओढ्याला पूर आल्याने गावातील अनेक वाड्यावस्त्यांवर जाण्याचे मार्ग बंद पडले आहेत. संपूर्ण गाव जलमय झाले आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे गावात असलेल्या २१ प्रकारच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फलटण शिखर शिंगणापूर रस्त्यावर सोनवडी गावात ओढ्याला आलेल्या पुरामुळे फलटण शिखर शिंगणापूर रस्ता सकाळपासून वाहतुकीसाठी बंद आहे. आंबा, डाळिंब, द्राक्षे, ऊस यासह फळभाज्या व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावागावात पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.