सातारा जिल्ह्यातील पाच पालिकांचं मैदान यंदा ‘खुलं’!; यंदा राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्यांमध्ये घमासान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:04 IST2025-10-07T14:04:03+5:302025-10-07T14:04:21+5:30
नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर : सातारा, फलटण, वाई, कऱ्हाड, महाबळेश्वर पालिकेत घमासान

सातारा जिल्ह्यातील पाच पालिकांचं मैदान यंदा ‘खुलं’!; यंदा राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्यांमध्ये घमासान
सातारा : जिल्ह्यातील एकूण ९ पैकी महत्त्वाच्या ५ पालिकांमध्ये खुला प्रवर्ग, दोन पालिकांमध्ये खुला प्रवर्ग (महिला) तर दोन पालिकांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले. मेढा नगर पंचायत खुल्या प्रवर्गासाठी आणि लोणंद नगराध्यक्षपद खुला प्रवर्ग (महिला) आरक्षित झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी यंदा राजकीय पक्ष व स्थानिक आघाड्यांमध्ये घमासान पाहायला मिळणार आहे.
मुंबईतील मंत्रालयात सोमवारी (दि. ६) नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल? याकडे लोकप्रतिनिधींसह राजकीय धुरिणांचे लक्ष लागले होते. ही प्रतीक्षा आता संपली असून, ‘कारभारी’ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांचे राजकीय भवितव्य स्पष्ट झाले.
पाचगणी, मलकापूर अनुसूचित जातीसाठी..
जिल्ह्यातील सातारा, फलटण, वाई, कऱ्हाड व महाबळेश्वर या महत्त्वाच्या पाच पालिका खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने येथे यंदा इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे. रहिमतपूर व म्हसवड या पालिकांत महिला नेतृत्वाला संधी मिळणार असून, येथे खुला प्रवर्ग महिला असे आरक्षण निश्चित झाले आहे. पाचगणी व मलकापूर पालिकेत मात्र यंदा अनुसूचित जाती प्रवर्गाला संधी मिळणार आहे.
सोडतीनंतर ‘कही खुशी, कही गम’
आरक्षण जाहीर होताच सातारा, फलटण, कऱ्हाड येथील इच्छुकांच्या गोटात उत्साहाचे वातावरण दिसले, तर ज्यांना आरक्षणामुळे संधी गमवावी लागली, त्यांचा मात्र भ्रमनिरास झाला. आता नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि स्थानिक नेत्यांचा कस लागणार आहे. लवकरच विकासाच्या मुद्द्यांसोबतच राजकीय डावपेचांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. या रणसंग्रामात कोणाचे डावपेच यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
असे आहे आरक्षण
- सातारा : खुला प्रवर्ग
- फलटण : खुला प्रवर्ग
- वाई : खुला प्रवर्ग
- कऱ्हाड : खुला प्रवर्ग
- महाबळेश्वर : खुला प्रवर्ग
- रहिमतपूर : खुला प्रवर्ग (महिला)
- म्हसवड : खुला प्रवर्ग (महिला)
- पाचगणी : अनुसूचित जाती
- मलकापूर : अनुसूचित जाती
- मेढा (नगर पंचायत) : खुला प्रवर्ग
- लोणंद (नगर पंचायत) : खुला प्रवर्ग (महिला)