Satara-ZP Election: हिंगणगाव गटात दोन निंबाळकरांत लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:33 IST2026-01-13T19:31:57+5:302026-01-13T19:33:39+5:30
महायुती अन् शिंदेसेनेत सरळ लढत

Satara-ZP Election: हिंगणगाव गटात दोन निंबाळकरांत लढत
सूर्यकांत निंबाळकर
आदर्की : हिंगणगाव जिल्हा परिषद गट व सासवड आणि हिंगणगाव पंचायत समिती गणांच्या आगामी निवडणुकीत महायुती आणि शिंदेसेना यांच्यात सरळ व रंगतदार लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फलटण तालुक्यात एकच हिंगणगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने निंबाळकर घराण्यात निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
हिंगणगाव जिल्हा परिषद गटात हिंगणगाव गणामध्ये हिंगणगाव, परहर बुद्रुक, आदर्की बुद्रुक, आदर्की खुर्द, शेरेचीवाडी, सालपे, तांबवे, चांभारवाडी व आरडगाव ही गावे समाविष्ट आहेत. तर सासवड गणात सासवड, वडगाव, वाघोशी, पिराचीवाडी, ताथवडा, कोराळे, आळजापूर बीबी, कापशी, टाकूबाईचीवाडी, झडकबाईचीवाडी मलवडी व मानेवाडी या गावांचा समावेश होतो.
शिंदेसेनेकडून या गटात जिल्हा परिषदेचे व नियोजन समितीचे माजी सदस्य धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट यांच्या पत्नी, माजी जिल्हा सदस्या सारिका अनपट यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. तर सासवड गणातून सासवडचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल रासकर यांचे नाव चर्चेत आहे.
ही नावे आहेत चर्चेत...
हिंगणगाव गणातून माजी पंचायत समिती सभापती दिवंगत शरदराव भोईटे यांच्या पत्नी सीमा भोईटे तसेच माजी पंचायत समिती सदस्य खंडेराव भोईटे यांच्या स्नुषा मोहिनी भोईटे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. महायुतीकडून जिल्हा परिषदेसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी ॲड. जिजामाला नाईक- निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या स्नुषा जोत्स्ना साळुंखे-पाटील तसेच विलासराव नलवडे यांच्या स्नुषा ॲड. किरण नलवडे यांच्या नावांची जोरदार चर्चा होत आहे.
उमेदवारीबाबत चर्चा मात्र जोमात...
हिंगणगाव गणासाठी महायुतीकडून हिंगणगावचे माजी सरपंच सुरेश भोईटे यांच्या पत्नी सीमा भोईटे यांचे नाव चर्चेत असून, सासवड गणातून संतोष खताळ व किरण जाधव यांच्या उमेदवारीबाबत चर्चा जोमाने सुरू आहे.