सातारा जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरूवात; कोयना धरणात पाण्याची आवक वाढली, दरवाजे एकवरुन दोन फुटावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:52 IST2025-08-25T19:52:03+5:302025-08-25T19:52:54+5:30
नवजाचा पाऊस पाच हजार मिलिमीटरजवळ..

सातारा जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरूवात; कोयना धरणात पाण्याची आवक वाढली, दरवाजे एकवरुन दोन फुटावर
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाला पुन्हा सुरूवात झाली असून धरण पाणलोट क्षेत्रातही चांगली हजेरी आहे. त्यामुळे धरणात आवक वाढू लागली आहे. कोयना धरणातीलपाणीसाठाही १०१ टीएमसीवर गेला आहे. त्यामुळे सांयकाळच्या सुमारास कोयनेचे दरवाजे एकवरुन दोन फुटापर्यंत वर घेऊन विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर अतिवृष्टी झाली होती. पश्चिम भागाला झोडपून काढलेले. मात्र, २० ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर तीन दिवस पावसाची उघडझाप सुरू होती. पण, रविवारपासून पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. सातारा शहरातही रिमझिम सुरू होता. तर साेमवारी पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ झाली. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर, कांदाटी खोऱ्यात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे प्रमुख धरणांतही पाणी आवक वाढू लागली आहे.
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २५, तर महाबळेश्वरला ३० मिलिमीटरची नोंद झाली. तसेच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडत आहे. यामुळे धरणांत आवक सुरू आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १५ हजार ४४४ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर पाऊस वाढल्याने सांयकाळी कोयनेत १७ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते.
धरणात १०१.१३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे सायंकाळी चारनंतर धरणाचे दरवाजे एकवरुन दोन फुटापर्यंत वर घेण्यात आले. त्यामुळे दरवाजातून १६ हजार ८०० आणि पायथा वीजगृह २ हजार १०० असा एेकूण १८ हजार ९०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यास कोयना धरणातून आणखी विसर्गात वाढ होण्याचा अंदाज आहे.
नवजाचा पाऊस पाच हजार मिलिमीटरजवळ..
जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ४ हजार ९७६ मिलिमीटर झाला आहे. यानंतर महाबळेश्वरला ४ हजार ७४२ आणि कोयनानगरला ४ हजार ७४ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर सध्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख प्रकल्पात १४३.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. याची टक्केवारी ९६.३५ टक्के आहे. तर मध्यम प्रकल्प सुमारे ८४ टक्के भरलेत. ७.३६ टीएमसी या प्रकल्पात पाणीसाठा झालेला आहे.