पावसाचे चक्र बदलले, पेरणीचे नियोजन बिघडले; सातारा जिल्ह्यात शेकडो हेक्टर क्षेत्र नापेरची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:33 IST2025-08-09T16:32:37+5:302025-08-09T16:33:46+5:30
अंतिम टप्प्यातील पेरणी सुरूच

पावसाचे चक्र बदलले, पेरणीचे नियोजन बिघडले; सातारा जिल्ह्यात शेकडो हेक्टर क्षेत्र नापेरची शक्यता
सातारा : पावसाचे चक्र बदलल्याने यावर्षी जिल्ह्यात मे आणि जूनमध्ये ही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे वेळेत वाफसा न आल्याने खरीप पेरणीवर परिणाम झाला. त्यातच आता ऑगस्ट महिना सुरू असला तरी अंतिम टप्प्यातील पेरणी सुरूच आहे. सुमारे पावणे तीन लाख हेक्टरवर पेर पूर्ण झालेली आहे. याचे प्रमाण ९१ टक्के आहे. तरीही यावर्षी शेकडो हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची ही शक्यता आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ९७ हजार ९१३ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ९२ हजार ८७५ हेक्टर आहे. तर भाताचे ४७ हजार ४९२, खरीप ज्वारी ६ हजार, बाजरीचे ५० हजार ३५१, मका पिकाचे १३ हजार १५३, भुईमूग ३१ हजार हेक्टर राहण्याचा अंदाज होता तसेच इतर पिकांचे क्षेत्र कमी प्रमाणात आहे; पण यावर्षी पाऊस वेळेत झाला; पण सतत पाऊस असल्याने पेरणीसाठी वेळेत वाफसा आलाच नाही. त्यामुळे पेरणी पुढे गेली. आता तर ऑगस्ट महिना सुरू आहे. त्यामुळे खरिपातील पेरणी १०० टक्के होण्याची शक्यता कमी आहे.
खरिपात आतापर्यंत भाताची सुमारे ४२ हजार हेक्टरवर लागण झालेली आहे. हे ८८ टक्के प्रमाण आहे. खरीप ज्वारीची ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीची सुमारे ३७ हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. ७३ टक्के ही पेर आहे. पेरणीची वेळ निघून गेल्याने यंदाही बाजरीचे क्षेत्र कमीच राहणार आहे. मका पिकाची २६ हजार ७१२ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. २०३ टक्के ही पेर आहे. तसेच अजूनही मका पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. भुईमुगाची २५ हजार २७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ८२ टक्के हे प्रमाण आहे.
जिल्ह्यात मागील तीन वर्षांत सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी आतापर्यंत सुमारे ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. ८६ टक्के पेरणी पूर्ण आहे. तसेच तूर, मूग, उडीद, कारळा, सूर्यफूल या पिकाखालील क्षेत्र कमी आहे.
फलटण तालुक्यात १०७ टक्के पेरणी पूर्ण..
जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात आहे. सध्या जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ भागात भात लागण सुरू आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक १०७ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तर सातारा तालुक्यात ७७ टक्के, जावळी तालुक्यात ८० टक्के, पाटण ७८, कऱ्हाड ९२, कोरेगाव ९०, खटाव १०६, माण १०३, खंडाळा १०२, वाई ८८ आणि महाबळेश्वर तालुक्यात ८४ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. माण, खटाव, फलटण, खंडाळा या तालुक्यात बाजरी पिकाचे क्षेत्र घटले आहे.