सातारामध्ये पावसाच्या सरी

By Admin | Updated: July 4, 2014 00:26 IST2014-07-04T00:20:44+5:302014-07-04T00:26:49+5:30

कोयनेत १७ मिमी पाऊस

Rain showers in Satara | सातारामध्ये पावसाच्या सरी

सातारामध्ये पावसाच्या सरी

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे सर्वांचेच लक्ष वरुणराजाकडे लागलेले असतानाच गुरुवारी सकाळी सातारा, तर महाबळेश्वरमध्ये दुपारी तीननंतर पावसाने हजेरी लावली. रिमझिम सरींमुळे सातारा शहर न्हाऊन निघाला.
सातारा शहरात गुरुवारी सकाळपासून ढग जमा झाले होते. अकरानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दोन तास पावसाच्या सरी कोसळतच होत्या. अनेक दिवसांनंतर झालेल्या पावसामुळे सातारकरांमध्ये उत्साह दिसून येत होता. शहर परिसरातील अजिंक्यतारा, यवतेश्वरच्या डोंगरावर ढग जमा झाल्याने अनेक तरुणांनी गाड्या घेऊन डोंगरावर जाऊन भिजण्याचा आनंद लुटला.
महाबळेश्वरमध्ये बुधवारी काही प्रमाणात पाऊस झाला होता. त्यानंतर आज कडक ऊन पडले होते. दुपारी तीननंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळच्या सहानंतरही पावसाच्या सरी कोसळतच होत्या. महाबळेश्वरमध्येही चांगल्या पावसासाठी चार दिवसांपूर्वी पद्मेश्वरला जलाभिषेक घालून पाण्यात कोंडले होते.
आजच्या पावसामुळे महाबळेश्वरमधील ग्रामस्थ, व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत होते. गुरुवारी
सायंकाळी साडेपाचला झालेल्या चोवीस तासांत महाबळेश्वरमध्ये १९.० मिलीमीटर (एकूण २६३.१ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली.
कोयना पाणलोट क्षेत्रातही पावसाच्या सरी सकाळपासूनच कोसळत होत्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत पावसाच्या सरी कोळसतच होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Rain showers in Satara