कराडात भरधाव डंपरच्या धडकेत प्राध्यापिका जागीच ठार, अपघातानंतर चालक पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:09 IST2026-03-26T13:09:02+5:302026-03-26T13:09:25+5:30
बारा फूट फरफटत नेले

कराडात भरधाव डंपरच्या धडकेत प्राध्यापिका जागीच ठार, अपघातानंतर चालक पसार
कराड (जि.सातारा) : डबर वाहतूक करणाऱ्या डंपरने दिलेल्या जोराच्या धडकेत डॉ. सुषमा आनंदा कीर्तने (वय ५४, रा. गजानन हौसिंग सोसायटी, ता. कराड) या प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कराड-विटा मार्गावर जनता बाजार समोरील चौकात बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, अपघात घडल्यानंतर चालकाने पलायन केले. तर घटनास्थळावरून डंपर पोलिस ठाण्यात नेत असताना डंपरमधील दगड वाटेतच उतरविण्यात आल्याने घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी थेट शहर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केला. त्यामुळे काहीकाळ पोलिस ठाणे आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सैदापूर विद्यानगर येथील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका असलेल्या डॉ. सुषमा कीर्तने या महाविद्यालय सुटल्यानंतर कराडमध्ये त्यांच्या दुचाकीवरून कामानिमित आल्या होत्या. जनता बाजार चौकातून दुचाकीवरून त्या निघाल्या असता त्याचवेळी कराड-विटा मार्गावरील कृष्णा नाका बाजूकडून विजय दिवस चौकाकडे दगड घेऊन एक डंपर (एमएच ५० एम ५४५४) ने प्राध्यापिका कीर्तने यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. भीषण धडक देत डंपरने दुचाकीसह कीर्तने यांना दहा ते बारा फूट अक्षरशः फरफटत पुढे नेले. त्यामुळे जखमी कीर्तने यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.