Satara: मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ‘पिल्या’ कराडात आला, पोलिसांनी पिस्टलसह पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:21 IST2025-12-31T17:19:01+5:302025-12-31T17:21:12+5:30
६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Satara: मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ‘पिल्या’ कराडात आला, पोलिसांनी पिस्टलसह पकडला
कराड : आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याचे दुःख त्याला सहन झाले नाही आणि बदला घेण्यासाठी त्याने थेट कराड गाठले; मात्र कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी पिस्टलसह त्याला पकडले. पिल्या ऊर्फ श्रेयस श्रीरंग पवार या संशयिताकडून ६५ हजार किमतीचे देशी बनावटीची पिस्टल, ४ हजार रुपये किमतीचे २ जिवंत काडतुसे, असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच, त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
पिल्या ऊर्फ श्रेयस श्रीरंग पवार, रा. लिगाडे पाटील कॉलेज समोर सैदापूर (ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिस अधीक्षक दोशी म्हणाले, ‘कराड एसटी स्टँड समोरील एका मोबाइल शॉपीत अखिलेश नलवडे याचा ढकलून देऊन खाली पडल्याने हयगयीने मृत्यू झालेला होता. त्यामधील संशयित अजिम चांद बादशहा मुल्ला (रा. मलकापूर, ता. कराड) यास ठार मारण्याच्या उद्देशाने मृत्यू पावलेल्या अखिलेश नलवडे याचा मित्र पिल्या ऊर्फ श्रेयस श्रीरंग पवार हा पिस्टलसह गजानन हौसिंग सोसायटी परिसरामध्ये फिरत होता.
याची माहिती मिळाल्यानंतर कराड शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी सोमवार, दि. २९ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांसह तत्काळ छापा टाकत कारवाई केली. संशयिताला पकडण्याची कामगिरी कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर, पोलिस अंमलदार सतीश पाटील, संदीप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, मोहसीन मोमीन, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, धीरज कोरडे, मुकेश मोरे, संग्राम पाटील, आनंदा जाधव यांनी केली.
रात्रीच छापा टाकून घेतला ताब्यात..
छापा टाकल्यानंतर पिल्या ऊर्फ श्रेयस पवार याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यानंतर त्याच्याकडून ६५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे, असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.