Satara Crime News: ऊसतोड कामगाराच्या खूनप्रकरणी मुख्य संशियाताला अटक, शेतात लपविला होता मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:29 IST2026-01-30T15:28:59+5:302026-01-30T15:29:14+5:30
कोरेगाव : भोसे गावच्या हद्दीत प्रेमसंबंधांच्या संशयातून ऊसतोड कामगाराची हत्या झाल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. या ...

Satara Crime News: ऊसतोड कामगाराच्या खूनप्रकरणी मुख्य संशियाताला अटक, शेतात लपविला होता मृतदेह
कोरेगाव : भोसे गावच्या हद्दीत प्रेमसंबंधांच्या संशयातून ऊसतोड कामगाराची हत्या झाल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अजय राजेंद्र माने (रा. भोसे) याला कोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मच्छिंद्र अंबादास भोसले (वय ४५) हा जरंडेश्वर शुगर मिल येथे ऊसतोड व वाहतुकीचे काम करत होता. अजय माने याचे मच्छिंद्रच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दि. १५ जानेवारी रोजी अजय माने याने मच्छिंद्रला जेवणाच्या आमिषाने बाहेर नेल्यानंतर तो बेपत्ता झाला. १७ जानेवारी रोजी याबाबत कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
दि. २० जानेवारी रोजी धोम डावा कालव्याशेजारी उसाच्या शेतात मच्छिंद्रचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पाहणीत डोक्यावर व चेहऱ्यावर अवजड हत्याराने वार केल्याचे स्पष्ट झाले. प्रेमसंबंधांच्या संशयातूनच अजय माने याने हत्या करून मृतदेह शेतात लपविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास कोरेगाव पोलिस करीत आहेत.