Satara Crime: खून करुन फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी वेशांतर करुन जंगलात पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:36 IST2025-08-11T13:35:51+5:302025-08-11T13:36:40+5:30
आत्महत्येचा केला होता बनाव!

Satara Crime: खून करुन फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी वेशांतर करुन जंगलात पकडले
उंब्रज : खुनाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला उंब्रज पोलिसांनी वेशांतर करून सिनेस्टाइल पाठलाग करून जंगलातून अटक केली. सूरज संपत साळुंखे (२९, रा. नागठाणे, ता. सातारा), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
उंब्रज पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सागर खबाले, हवालदार नंदकुमार निकम, पोलिस अंमलदार प्रफुल्ल पोतेकर खासगी वाहनाने तारळे दूरक्षेत्र परिसरात गस्त घालत होते. त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वडूज (ता. खटाव) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक वर्षापूर्वी झालेल्या खुनातील आरोपी सूरज साळुंखे हा तारळे-जंगलवाडी (ता. पाटण) रस्त्यावर उभा आहे.
यानंतर पोलिस उपनिरीक्षक खबाले यांनी याबाबत तातडीने उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांना कळवले. तातडीने वेशांतर करून खबाले व त्यांची टीम त्या ठिकाणी रवाना झाली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी सूरज साळुंखे त्या ठिकाणाहून जंगलाच्या दिशेने पळून गेला. तेव्हा खबाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर अटक करून त्याला वडूज पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे एक वर्षाच्या खून खटल्याच्या तपासाला वेग येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आत्महत्येचा केला होता बनाव!
कणसेवाडी (ता. खटाव) येथील विजय महादेव डोईफोडे (वय ३४) यांनी १६ जून २०२४ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली होती. मात्र, पोलिसांना याबाबत शंका आल्याने याप्रकरणी कसून चौकशी केली. त्यावेळी डोईफोडे यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे तपासात समोर आले. आत्महत्येचा बनाव करण्यात आला होता. वडूज पोलिसांनी याप्रकरणी अधिक बाबासाहेब जाधव (वय ४०, रा. कणसेवाडी, ता. खटाव ) याला अटक केली. सध्या तो प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन जामिनावर बाहेर आहे. यातील दुसरा आरोपी सूरज साळुंखे हा एक वर्षापासून फरार होता, असे पोलिसांनी सांगितले.